आईपण अनुभवताना

मीराच्या मुलीला नुकतेच सहा महिने पूर्ण झालेले. गोरापान चेहेरा, दाट जावळ, मोठाले डोळे, गोबरे गाल.. मीरा आपल्या लेकीकडे कौतुकाने पाहत होती. “रावी…” रावीने आता छान बाळसंही धरलं होतं. खूप वर्ष वाट पाहिल्यानंतर रावीचा जन्म झाला आणि सारे घर आनंदून गेले.
मीराच्या सासुबाईंना आता मीरासाठी काय करू आणि काय नको असे झाले होते.
सासुबाईंनी मीराला आणि बाळाला अगदी छान सांभाळले. ‘तिला बाळाची काळजी कशी घ्यायची’ हे अगदी जातीने शिकवले. मीराला काय हवं नको ते सारं काही स्वतः पाहिलं त्यांनी. या लाडाने, त्यांच्यापासून दुरावलेली मीरा आपल्या अगदी सासुबाईंच्या जवळ आली.
सहा महिन्यांनंतर मीरा महिना दोन महिने माहेरी जाणार होती. खरंतर डिलिव्हरी नंतरच जायचे होते, पण ‘बाळंतपण सासरीच होणार ‘असे ठामपणे सांगत सासुबाई आग्रहाने तिला आपल्या घरी घेऊन आल्या.
सहा महिन्यांनी माहेरी आलेल्या मीराला आता ऑफिसचे वेध लागले. मीराने अचानक पुन्हा ऑफिस जॉईन करण्याचा निर्णय घेतला. हे ऐकून आई चिडलीच. “इतक्या लहान बाळाला सोडून ऑफिसमध्ये मन लागेल का तुझे?” असे मीराच्या मागे आईचे सारखे पालुपद सुरू होते.
“अगं लहान बाळाची आई ना, तू? असं कसं सोडून जावसं वाटतं आपल्या लहानग्या लेकीला?
आम्ही तुम्हाला क्षणभरही नजरे आड करत नव्हतो गं बाई. वर्षभराने ऑफीसला गेलीस तर काही फरक पडणार नाही. आमचे जावईबापू चांगले कमावते आहेत बरं.”
पण इथे मीराला आपल्या ऑफिसची ओढ लागली होती. एकदा का कामाची लिंक तुटली की, पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागणार होती आणि हे मीराला नको होते.
‘घरी सासुबाई बाळाला सांभाळतील आणि वर कामाला एखादी बाई ठेऊ’ असे मीराने मनोमन ठरवूनही टाकले होते. तिने आपल्या नवऱ्याला विचारताच तोही ‘नाहीच’ म्हणाला, त्यामुळे मीरा थोडी नाराज झाली होती.
मीरा आईचेही काही ऐकायला तयार होईना, म्हणून आईने तिच्या सासुबाईंना गुपचूप फोन केला आणि त्यांना मीराचा निर्णय सांगितला. हे ऐकून ‘बाळाच्या आठवणीने अगदीच राहवेना’, म्हणून दुसऱ्याच दिवशी सासुबाई मीराच्या माहेरी हजर झाल्या.
नात आणि आजीची दंगामस्ती खूप वेळ चालली. आजीच्या स्पर्शाने रावी सुखावली आणि त्यांच्या कुशीत शिरून झोपून गेली.
रावी झोपलेली पाहताच मीराच्या आईने हळूच ऑफिसचा विषय काढला. तशा सासुबाई म्हणाल्या, “अगं इतक्या लहान बाळाला सोडून ऑफिसमध्ये काम करू शकणार नाहीस तू. आता हे सोपे वाटते, पण आपले लहान बाळ असताना घरातून पाय निघत नाही. तिथे कामात मनही लागत नाही मीरा.
आपले मूल आत्ता काय करीत असेल. त्याला भूक लागली असेल का? त्याने काही खाल्ले असेल का? आपली आठवण तर येत नसेल त्याला? असे असंख्य प्रश्न आईच्या मनात सतत येत राहतात.
तुला मध्येच बाळाला मायेने जवळ घेऊ वाटेल! त्याच रडणं कानात घुमत राहिल.. अशावेळी मन अस्वस्थ होत गं आईचं.”
हे सारं ऐकून मीराच्या चेहेऱ्यावरचे हावभाव बदलत होते.
मीराला आपलं म्हणणं पटतय असं दिसताच, पुढे सासुबाई म्हणाल्या “आम्ही आहोतच गं बाळाला सांभाळायला. पण आपल्या बाळाला डोळ्यासमोर मोठं होताना पाहण्याचा आनंद एका ‘आईसाठी’ काही निराळाच असतो. बाळाच्या गमती जमती, त्याच्या बाळलीला अनुभवणे, त्याची काळजी करणे, म्हणजे एका आईसाठी फार फार मोठा आनंद असतो.
हे क्षण परत येत नाहीत गं आणि कामात गॅप पडला तर पडू दे, तो भरून काढता येईल नंतर. पण हा आनंद पुन्हा -पुन्हा अनुभवायला मिळत नाही, हेच खरं. पूर्वीचे दिवस राहिले नाहीत आता आणि मीरा,आईपण अनुभवायलाही नशीब लागतं.
कामाचं म्हणतेस तर, वर्षा-दीड -वर्षानंतर निश्चिंत मनाने जा कामाला. तोवर रावी थोडी मोठी होईल. मग आम्हाला काळजी राहणार नाही, दोघींचीही.”
बोलता -बोलता सासुबाई आणि आई दोघीही मीराच्या चेहेऱ्यावरचे बदलते हावभाव टिपत होत्या. तिला सासुबाईंचे म्हणणे पटलेले दिसले, तशी आई थोडी निश्चिंत झाली.
इतक्यात नवऱ्याचा फोन आला म्हणून मीरा थोडी बाजुला गेली आणि काही वेळातच रावी रडू लागली, ती काही केल्या शांत होण्याचे नावच घेईना!
मीरा येईपर्यंत तिची वाट पाहत असल्यासारखी रडतच होती ती.
आपल्या लेकीचं रडणं ऐकून मीरा धावत आली. तिला पाहताच रावी तिच्याकडे झेपावली आणि तिला घट्ट बिलगून बसली. आता तिचे रडणेही शांत झाले होते.
तशी मीराने आपल्या आईकडे आणि सासुबाईंकडे एक नजर टाकली. त्या मीराकडे आणि रावीकडे पाहत होत्या, अगदी समाधानाने. तशी आपल्या गोड लेकीकडे पाहत मीरा हळूच म्हणाली..”आईपण अनुभवला नशीब लागतं, हे मात्र खरं.”
©️®️ सायली
==================
तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.
=============
नमस्कार वाचकहो🙏🙏,
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.
उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.