आई,शिकवाल नं मला पुरणपोळी!

©® सौ. गीता गजानन गरुड.
‘होळी आली बाई जवळ..सामान आणायला हवं.’ ललिता स्वत:शीच बोलत सामानाची यादी करत होती.
तिची सासूही जवळ येऊन बसली. “अर्धा किलो चणाडाळ, अर्धा किलो गुळ, अर्धा किलो मैदा, थोडा बारीक रवा लिही. ते वेलची सिरप नको. वेलचीची हिरवीगार बोंड आण. घरी कुटू. जायफळ, सुंठही आण. मी देईन कुटून.”
ललिता, सासू सांगेल तसं मान हलवत लिहून घेत होती. लग्नाला पंचवीसेक वर्ष होत आली. पुरणपोळीचं साहित्य का तिला ठाऊक नव्हतं पण सासूचं ऐकत लिहायला आवडायचं तिला.
माहेरी फक्त खाण्यापुरती स्वैंपाकघरात रमणारी लली सासरी आल्यावर सासूच्या प्रेमळ छत्रछायेखाली एकेक पदार्थ शिकत गेली.
पहिल्याच दिवशी तिच्या हातनं भाजीचं पातेलं पडलं होतं, तेंव्हा किती घाबरली होती लली पण सासूने झट की पट बटाट्याच्या काचऱ्या करुन दिल्या होत्या तिच्या हातात. बाहेर पंगत बसली होती केवढी! नणंद, नणंदेचे पती, सासरे, तिचे अहो, दिर.
सासूने असं आयत्यावेळी सांभाळून घेतल्याने तेव्हापासनं सासू तिला आपलीशी वाटू लागली होती. माहेरी काही खोड्या काढल्या की आई पाठीशी घ्यायची तशीच इथे सासरी सासू घेणार सांभाळून असा विश्वास गिरजाईने ललीच्या मनात निर्माण केल्यानेच ती आश्वस्थ झाली होती.
लग्नानंतर वर्षभरात गिरजाईच्याच ओळखीने ललिता एका बिल्डरच्या ऑफिसमधे रिसेप्शनिस्ट म्हणून कामाला राहिली होती. ललिताच्या दिव्यांशचं बालपण, त्याचे लाडकोड सारं ललितापेक्षा काकणभर जास्त गिरजाईनेच केलं होतं. चिडायची अधीमधी गिरजाई ललीवर पण काही वेळातच पुन्हा बोलूही लागायची.
गिरजाईच्या जीवावर संसार टाकून, लली दिव्यांशला घेऊन उन्हाळ्यात माहेरसुख अनुभवू शकत होती.
वयोपरत्वे गिरजाईला मधुमेहाने ग्रासलं होतं,सोबत रक्तदाब,संधिवातासारखी दबा धरुन बसलेली दुखणीही आक्रमण करु लागली होती. गिरजाई पुरती बेजार झाली होती पण लली मात्र गिरजाईच्या औषधगोळ्या वेळेवर देत होती.
मधुमेहामुळे गिरजाईला अवेळी लागणारी भूक ओळखून गिरजाईसाठी मेथीचे ठेपले, पानगी..असं काही नं काहीतरी पथ्याचंच पण रुचकर असं करुन ठेवीत होती.
अगदी कुंडीत गहू रुजत घालून त्या लुसलुशीत गव्हांकुराचा रसही ती गिरजाईला प्यायला लावत होती तर कधी मुद्दाम वाट वाकडी करुन स्टेशनला जाऊन तिथनं रसरशीत कोहळा आणून त्याचा रस काढून देत होती.
सण आला की मात्र गिरजाई आपल्यावरची बंधनं झुगारुन द्यायची. तिची पथ्याचं खाऊन कंटाळलेली जिव्हा बंड करुन उठे आणि कालनिर्णयातली तारीख पाहून त्या त्या सणाआधी त्या सणाला होणारे गोडाचे पदार्थ तिच्या डोळ्यांसमोर तरळू लागत नि लाळग्रंधी आपसूक उद्दीपित होत.
सुनेच्या राज्यात गिरजाईचे लाड होत होते. अर्थात ते करुन घेण्यासाठी तिनेही तिच्या राज्यात सुनेला लाडात ठेवलं होतं, पण आता नातसून जी आली होती घरात, दिव्यांशची दिप्ती.
आपल्या मानेवर रेंगाळणाऱ्या केसांना चापामधे अडकवत दिप्ती डायनिंग हॉलमधे आली. सासूला म्हणजे ललीआईला काहीतरी लिहिताना पाहून तिचाही इंटरेस्ट चाळवला. तीही ललीआई एवढं काय बरं लिहितेय ते वाकून पाहू लागली. इंग्लिश मिडीयममधली असल्याने अक्षरं जुळवून वाचू लागली..च ना डा ल, गुल, जायफल..मेदा..
व्हॉट्स दीस लीलाई..मैदा,चनाडाल..ऑलरेडी यू आर गेनिंग वेट. आय फील अशेम्ड व्हाइल इन्टोड्युसिंग यू टू माय फ्रेण्ड्स..अँड व्हाय आर यू प्रिपेरिंग दिस डेलिकसी? त्यापेक्षा आपण बाहेरनं मागवू की. माझ्या मैत्रिणीच्या ओळखीतल्या काकू आहेत एक. त्या बनवतात पुरणपोळ्या. मोजक्या मागवल्या की मोजक्याच खाल्ल्या जातात. हे बघा आताच पिंग करते मी तिला.”
आणि लली काही बोलायच्या आत दिप्तीने काय ते.पिंगपाँग केलं.
हेलो..दिप्ती स्पीकींग.
हाय सारा, एक्चुचली मला नं पुरणपोळीची ऑर्डर द्यायचीय नि सोबत कटाची आमटी.
फिफ्टीन तरी पाठव. नाही आमच्या दोघांना सहा पुरल्या असत्या पण सासरे, सासूबाई,त्यांच्या सासूबाई..यु नो अवर्स ए जॉइंट फ्यामिली.”
लग्न होऊन महिना झाला होता, त्यातले दहा दिवस हनिमुन, ज्याला गिरजाई हनुमानच बोलायची. ती तरी काय करणार तिच्या मुखी हनुमानच बसला होता. मग आठदहा दिवस माहेर..नंतर सासरकडच्या नातेवाईकांकडे भ्रमंती,देवदर्शन..यात इकडच्या रीतीभाती ललीआईला तिला सांगायला वेळच मिळाला नव्हता नं सांगितलं,समजावलं तरी ते ऐकायचं, त्यानुसार वागायचं की नाही हे तिच्यावर अवलंबून होतं.
नातसुनेचं बोलणं ऐकून जिजाईचा मुडच गेला. बाहेरनं पोळ्या आणल्या की कसं मोजूनमापून आणायच्या,मोजूनमापूनच खायचं. गिरजाईला कसंसच झालं. ती गप्प आपल्या खोलीत निघून गेली. दुपार झाली होती. पडदा लावला नं पांघरुण ओढून घेऊन तिने डोळे मिटले.
थोड्याच वेळात ती भूतकाळात गेलीदेखील. परकरपोलकं ल्यालेली, दोन वेण्या उडवत वाडाभर उंदडणारी चमकत्या दातांची,लुकलुकत्या डोळ्यांची गिरिजा. गिरिजा आईसोबत मामीकडे जायची बैलगाडीतनं. मामाच बैलगाडी हाकत असायचा.
मामानं हाक दिली की सर्ज्या नं राजा विजेच्या वेगानं धावायचे अगदी, धुरळा उडायचा. बैलांच्या गळ्यातल्या लालनिळ्या मण्यांचा आवाज तालात घुमायचा. मामाचं घर आलं की दारात मामी उभी असायची. भाकरतुकडा ओवाळून टाकायची. मायलेकींच्या डोळ्यांना पाणी लावायची,पावलांवर पाणी घालायची नं गिरिजाच्या आईच्या कमरेभोवती हात गुंफुन माहेरशवाशिणीला घरात घ्यायची. गिरिजा मामाच्या कडेवर जाऊन बसायची.
स्वैंपाकघरात जायफळ,सुंठ,वेलचीचा वास दरवळत असायचा. शेतातल्या चण्यांची डाळ पातेल्यात रटरटत असायची. एका बाजुला आज्जी विळीवर घरचाच गुळ चिरत असायची. डाळीत गुळ घातल्यापासनं गिरजेचं थोडंथोडं मागून खाणं सुरु व्हायचं.
मामी कणिक तिंबायची नि मुठीएवढालं मऊसूत पुरण उंड्यात भरुन हातावर खेळवत उंडयात ते लिलया जिरवायची नि वरती मोदकासारखं जोडायची. पोळपाटाला दादरा बांधून मामी एकेक गोळा सरसरसरसर फिरवायची. पहाताना वाटायचं, किती सोप्पय हे काम! लाटणीवरच पोळी घेऊन तव्यात टाकली जायची.
पांढऱ्याशुभ्र पदरातनं केशरी पुरण गिरजाला खुणावू लागायचं. गिरजाची आई फडकं घेऊन चुलीजवळ बसायची नि पुरणपोळीला अलगद शेकायची. अशी टम्म झालेली पुरणपोळी पाहून गिरजेचे डोळे विस्फारायचे नि ती आपसूक टाळ्या वाजवू लागायची.
मग मामा,मामाचा दिग्या,आजोबा नं गिरिजेची अंगतपंगत बसायची. तुपाची वाटी,नारळाचं दूध नं मऊ लुसलुशीत पुरणाची पोळी..तोंडात जाताच विरघळाची..मग पुढचे चारेक दिवस कधी कडबोळे, कधी बासुंदीपुरी अशी गिरजेची बडदास्त असायची पण तिला मोहवून टाकायची ती पुरणपोळीच.
किती गं मऊ पुरणपोळी, तोंडात टाकायची फुरसत विरघळलीच..गिरजाई झोपेत बरळत असताना, अशा दुपारच्या का झोपल्या सासूबाई म्हणत लली तिथे आली. गिरजाईचे शब्द ऐकून तिला हसूच आलं. म्हातारपण म्हणजे दुसरं बालपणच ती स्वत:शी पुटपुटली नि सासूच्या अंगावरचं पांघरुण तिने सारखं केलं.
“आईंनी फारच मनावर घेतलय पुरणपोळी खायचं,” लली नवऱ्याला म्हणाली.
“अगं पण तुझी कंबर, पाठ..”
“ती मेली नेहमीचीच. मी वाणसामान घेऊन येते नि डाळ शिजत ठेवते. आजच पुरण करुन ठेवू. उद्या पीठ मळलं नि पोळ्या केल्या की झालं..दिप्तीही मागवणार आहे पुरणपोळ्या. त्याही खाऊ. काही नासत नैत. ठेवून देऊ नि साताठ दिवस गरम करुन तूप लावून खाऊ.”
झालं. चणाडाळ शेगडीवर रटरटू लागली. केशरी गुळ किसून झाला. सुंठ,वेलदोडे,जायफळं कुटाचा सुगंध घरभर दरवळू लागला.गुळ डाळीचं सख्य जमलं..तसं पुरणयंत्र घेऊन यजमान बसले नि जुनी गाणी ऐकत दट्ट्या फिरवू लागले. दोघांच्या संगतीत मऊसूत,स्निग्ध पुरण तयार झालं. ललीने ते नीट प्याक करुन ठेवलं.
दुसऱ्या दिवशी दिप्तीने ऑर्डर दिलेल्या पोळ्या आल्या. दिप्ती होळीला जाण्यासाठी साडी नेसायला गेली तशी ललीने तिंबून ठेवलेली कणिक काढली.
छान तन्यता आली होती कणकेला. इवलाश्या गोळ्याची पारी करुन त्यात पुरण ठेवलं नि गोळा तयार केला. एकेक पोळी लाटून तव्यावर जाऊ लागली. अहाहा! गोड,खरपुस सुगंध..लेक मोबाईल घेऊन धावत आला. “आई, तुही केल्यास. अगं पण दिप्तीने..”असं म्हणत त्याने पुरणाचा गोळा तोंडात कोंबला.
“रेडीमेड पोळ्यांत हे असं मऊसूत पुरण खायला कुठे मिळणार नं.” लेकाचा संतुष्ट चेहरा पहात लली म्हणाली.
लेकाने समाधान पावत मान डोलावली.
दिप्ती तयार होऊन बाहेर आली. टम्म फुगलेली पुरणाची पोळी बघताच तिने पोळीचे फोटो काढले नि ग्रुप्सवर शेअर केले.
दिप्ती नं दिव्यांश होलिकादेवीची पूजा करुन आले.
बटाट्याची सुकी भाजी,पुरणपोळी,वरणभात,कटाची आमटी,कुरडया असं पान करुन ललीने गिरजाईला जेवायला वाढलं..तेव्हा गिरजाई गालाला हात लावत सुनेकडे पाहू लागली.
लली म्हणाली,”आई, अहो तुम्ही शिकवलत तसंच केलय. तुम्हीच म्हणता ना, घरात सणाचं गोडधोड केलं की घर संतुष्ट होतं. या पुरणपोळीसारखेच आपले संबंध घराच्या अलवार पदरात जपले जाऊदेत हीच प्रार्थना.. नं दिप्ती तू मागवलेल्याही आण गं. दुसऱ्याच्या कष्टकरी हातचंही चाखूदे.”
दिप्तीने मागवलेल्या पुरणपोळ्याही छान होत्या. तशी पावती ललीने देताच दिप्ती खूष झाली. “अहो, आई पण किनई, तव्यावरची टम्म फुगलेली तुमची पुरणपोळी स्टेटसला टाकली नि किती लाईक्स मिळालेत पहा. नेक्स्ट टाईम ऑर्डर घे म्हणताहेत. आई शिकवाल नं मला पुरणपोळी!”
“हो पण एका अटीवर. तुही मला व्यायाम शिकवायचा. तुला शोभली पाहिजे नं.सासू!”
“ललीआई सॉरी नं.” ललीचा हात हाती घेत दिप्ती म्हणाली.
आज्जी कुरडईचा तुकडा कुडुम कुडुम खात सुनेचं नि नातसुनेचं लिंबलोणचं ऐकत होती नि गालात मंद हसत होती.
समाप्त
================
1 Comment
Neelima Deshpande
किती गोड कथा अगदी पुरणपोळी सारखी!