आई,आजी आणि श्रीखंड

©️®️ सौ. गीता गजानन गरुड.
“कित्ती मजा येते काकूकडे! काकू पावभाजी काय बनवते..आईस्क्रीम सुद्धा येतं तिला. आई तुला का नाही येत गं आईस्क्रीम करायला? काकूकडून विचारुन घे नं तू,”सुमी म्हणाली.
“काही नको. धड सांगितलन तर ठीक. एखादी स्टेप वगळून सांगते ती बया नि मग सगळ्या जिनसांचा विचका.”
“आई, ही बया कोण गं?”मोठाले डोळे करत सुमीने विचारलं.
“तुझी काकू.”
“काकूचं नाव बया आहे? पण..काका तर तिला पियु म्हणतो.”
“पियु म्हणेल काय न् पियुष म्हणेल काय,.नसते लाड करुन ठेवलेत बायकोचे.
“मग तिचं खरं नाव काय?” सुमीने कुतुहलाने विचारलं.
“प्रियांका इकडचं. मी चांगलं वामांगी सुचवत होते, पण नाही आवडलं तुझ्या काकाला. पियु पियु करता आलं नसतं त्याला.
सुमीने वामु वामु करुन पाहिलं . तिला अजबच वाटलं.”
सुमी मनात म्हणाली,”काकाचं बरोबरचै.”
“पण आई वाम म्हणजे डावा नं!”
“हो, स्त्री ही पुरुषाचं डावं अंग म्हणतात म्हणून वामांगी.”
“आई,पुरुष हा स्त्रीचं कोणतं अंग? म्हणजे त्यावरुन पुरुषाचंही नाव..”
“अग्गो किती वटवट तुझी?” देवासमोर वाती वळत बसलेली आजी करवादली.
“काय चुकलं आता माझं?”सुमी रागात आजीला विचारु लागली.
“चुकलं नाही गं सुमे पण आज तुझी प्रश्नावली ऐकायला वेळ नाही आईकडे. आज तिच्या बालमैत्रिणी यायच्याहेत जेवायला.”
आई तुझ्यापण मैत्रिणी होत्या? कधी बोलली नाहीस ते?” सुमीने फुलांच्या परडीतली लाल,जांभळी फुलं गोंजारत विचारलं.
“हो अगं, त्यांनीच पत्ता,फोन नं. मिळवला माझा.”
“नावं काय गं त्यांची?”
“एक मंदाकिनी न् दुसरी तारामती.”
नावं ऐकून सुमीला आलेलं हसू तिनं ओठांत दाबलं.
“म्हणजे ही माहेरची नावं हं. सासरची नाही बाई ठाऊक.”
“म्हणजे दोन दोन नावं असतात मुलींना?”सुमीचं कुतूहल वाढलं.
आजी खुदकन हसली,”सुमे तुझं लग्न होऊन तू सासरी गेलीस की तुझा नवराही तांदळाच्या परातीत तुझं नवीन नाव रेखाटणार.”
“पण मला माझं सुमन हेच नाव आवडतं. मी मुळीच बदलू देणार नाही माझं नाव त्याला. कुठे असेल गं आजी माझा नवरा? ही अश्शी जाते नि सांगून येते त्याला.”
सुमीच्या या चिवचिवाटावर आई,आजी दोघी हसू लागल्या.
आजी, तुझं नाव काय गं?” सुमीनं विचारलं.
“गुलाब माहेरचं न् इकडचं सुलोचना.”
“तुझं गुलाब,माझं सुमन,आई तुझं गं?”
“निशिगंधा.”
“अय्या! म्हणजे आपण सगळ्या फुलं नं,” सुमी हसत म्हणाली. हसताना तिच्या गालावर खोल खळी उमटली.
“तुझ्या आयशीचं नावही बदललं तुझ्या बाबाने. तो रमाकांत, हिचं रेवती ठेवलं पण मी बाई निशाच म्हणते तुझ्या आईला. लेकीसारखंच तर मायेने करते माझं सगळं.” आजी गंध उगाळत म्हणाली.
सुमीही आजीसोबत पुजेला बसली. आजीसोबत अथर्वशीर्ष म्हणू लागली.
आजी गुडघ्यावर हात ठेवत उठली नि शेजघरातल्या तिच्या खाटीकडे वळली.
“ए आजी पण तू काकूकडे गेलीस तर तीही तुझं सगळं मनापासून करेल.” सुमी आजीला सांगू लागताच सुमीची आई म्हणाली,”मी बरी जाऊ देईन. तुझ्या आजीशिवाय मुळीच करमायचं नाही मला. स्वैंपाकघरात काय आहे,काय संपत आलं, कोणता पदार्थ बरेच दिवस झाला नाही ,केला पाहिजे..यासारख्या सूचना मला आईच तर देतात.”
“म्हणजे तुझं पान पण हलत नाही आजीशिवाय असंच नं,”सुमी आईकडे उत्तराच्या अपेक्षेने पाहू लागली.
“बरं बोलायला शिकलीस गं सुमे चुणुचुणु,” आई कौतुकाने तिच्याकडे पहात म्हणाली.
“आणि ऐकायलासुद्धा.”
“म्हणजे गं?”आजीने विचारलं.
“काकूच्या मैत्रिणी आल्या होत्या. त्या म्हणत होत्या तिला,”मजाय बाई तुझी. राजाराणीचा संसार.” यावर काकू म्हणाली,”हो तर. उगा ते सासूचं लोढणं कोण गळ्यात मारुन घेईल! संधीवाताचं कारण सांगून बसून असते बया.आयतं खाते आणि थोरल्या जाऊबाई स्वत:ला ग्रुहक्रुत्यदक्ष, उत्तम सून वगैरे दाखवण्यासाठी करतात तिचं सगळं.”
आजीचा चेहरा खर्रकन उतरला नि थकले डोळे पाण्याने भरले.
सुमेच्या पाठीत जोरदार धपाटा बसला.
“कधी काय बोलायचं पायपोस नाही कारटीला. काढलंस नं आजीच्या डोळ्यातनं पाणी आणि हे असं मोठ्या माणसांच बोलणं ऐकू नये कितींदा सांगितलय तुला.”
सुमी हिरमुसली झाली. डोळ्यात आलेलं पाणी तिने बोटांनी पुसलं. तिचं काय चुकलं ते तिला कळेना.
इतक्यात मंदाकिनी, तारामती आल्या. मंदाकिनीचा स्वानंद तिच्या सोबत आला होता. सुमीची स्वानंदाशी छान गट्टी जमली. दोघंजणं दोरीच्या झोक्यावर चादर ठेवून झोके घेत होते. स्वानंद सुमीला त्याच्या घरी असलेल्या फिशटँकविषयी, कासवाविषयी बरीच माहिती देत होता. सुमी स्वानंदचं बोलणं मन लावून ऐकत होती.
“सुमी,चलं राजा पानं घ्यायला ये,”असं हाकारताच आईचा आपल्यावरचा राग गेला याची सुमीला खात्री झाली. तिने ताटं,वाट्या घेतल्या. अंगतपंगत बसली पण आजी..आजी बाहेर आलीच नाही.
सुमीची आई, आजीला बोलवायला गेली पण आजीने खुणेनेच भूक नाही म्हणून सांगितलं. मग सुमीची आई कशीबशी एक पोळी खाऊन उठली. खरंतर श्रीखंड आजीच्या आवडीचं. सामंतांकडचा चक्का आणून घेतलेला. साखर,वेलची,जायफळ,चारोळ्या..सगळं आजीच्या सूचनेनुसार घालून बनवलेलं पण मन विदिर्ण झालेल्या आजीने ते बोटभरही चाखलं नाही. सुमीने मात्र मिटक्या मारत श्रीखंडपुरी खाल्ली.
परत कुठे भेटुया वगैरे ठरवून मंदाकिनी,तारामती गेल्या.
सुमीची आई सासूकडे गेली. डोळे मिटून पहुडलेल्या सासूचे पाय चेपू लागली.
“तू कर जा गं निशे तुझी कामं. माझे पाय मुळीच दुखत नाहीएत. कशाला दाबतेस! चांगली ठणठणीत आहे मी.” पाय आक्रसून घेत सुमीची आजी पुटपुटली.
“पाय दुखत नाहीएत ओ पण मन दुखतय ना तुमचं. ठाऊकै मला नाहीतर पाहुणे आले आणि तुम्ही आतल्या खोलीत असं कधी झालंय!”
आजीने सुमीच्या आईकडे पाहिलं. “मनकवडी आहेस अगदी. या घरात आल्यापासनं माझी सेवा करतैस. दिराच्या लग्नात राबलीस. त्याने स्वतंत्र घर हवं म्हणून तगादा लावला तर नवऱ्याला गळ घालून त्याला पैशाची मदत केलीस आणि त्या प्रियांकाच्या मते तू टेंभा मिरवतेस न् मी ढोंगी. ढोंगी नाही गं मी. खरंच सांधे आकसतात माझे.” आजीच्या डोळ्यांतून ऊन ऊन टिपं घरंगळली.. तिच्या कानाजवळ ते थेंब जाऊ लागले.
सुमीला,आजीला असं रडताना पाहून वाईट वाटलं. तिने आपल्या सायीच्या बोटांनी आजीचे डोळे पुसले आणि तिच्या कुशीत शिरली. तिच्या पोटावर हात ठेवला.
“हे बघ सुमे. परत सांगते तुला. मोठ्यांची बोलणी ऐकू नयेत. “सुमीची आई म्हणाली.
“मी चोरुन थोडीच ऐकते..कानावर पडतं ते सांगितलं.” सुमीने आपली बाजू मांडली.
“चांगलं ते ऐकावं बाळा. अशी कुणी कुणाची उणीदुणी काढली तर या कानाने ऐकावं,त्या कानाने सोडून द्यावं,” आई समजावणीच्या सुरात म्हणाली.
सुमीने मान हलवली. तिला आईचं म्हणणं पटलं. तिने आजीच्या चेहऱ्याकडे पाहिलं. आई जशी पाय चेपत होती तशा आजीच्या वेदना कमी होत होत्या.
आईने सुमीला खुणेने आजी जेवली नसल्याचं सांगितलं.
सुमीने आजीच्या पोटाला कान लावला.
“पोट नाही गं दुखतय माझं,” आजी म्हणाली.
“अगं थांब. मी ऐकतेय नं.”
“काय ऐकू येतय तुला?”आईने विचारलं.
“आई,अगं आजीच्या पोटात कावळे,चिमण्या, पोपट,साळुंक्या सगळे गलका करुन राहिलेत.” सुमी म्हणाली तसं आजीला आलेलं हसू तिनं ओठांत दाबलं.
“हो का. काय मागणी आहे त्यांची?”
“खास सामंतांकडून आणलेल्या चक्क्याचं वेलची,जायफळ,केशरयुक्त श्रीखंड न् टम्म फुगलेल्या पुरीचा घास हवं म्हणताहेत.”
“मला भूक नाही,”आजी तोंड बाजूला करत म्हणाली.
“हा अन्याय आहे आजी..गरीब बिचाऱ्या पक्ष्यांवर. त्यांच्यासाठी तरी तू जेवलच पाहिजे. हो ना पक्ष्यांनो,” सुमीने आजीच्या पोटाला हात लावत म्हंटलं तशी आजीची कळी खुलली. आजी उठून बसली.
आईने आणलेल्या श्रीखंडपुरीचा घास आजीच्या मुखी घालत सुमी म्हणाली,”माझी शहाणी बाळी. उपाशीपोटी निजू नये. किती शिकवायचं तुला!”
“मी नाही कधी कुणाचं मन दुखावेलसं बोलणार. माझी शपथ.” सुमीने गळ्याकडे हात न्हेताच आजीने तिचा हात झटकला न् तिला जवळ घेतलं.
सुमीची आईही आपलं ताट घेऊन आली. “मघाशी ना गं जेवलीस आईटली तू.” सुमीने विचारलच.
“अगं ते मंदा,तारीला सोबत द्यायची म्हणून थोडं चाखलं. इकडे तुझी आजी उपाशी न् मला बरं श्रीखंड गोड लागेल.”
“तेही घरी बनवलेलं,”आजीने श्रीखंडपुरीचा घास खात आईच्या म्हणण्याला पुस्ती जोडली.
“आई,तो स्वानंद कसा वाटला गं तुला?”
“छान वळण लावलय मंदीने मुलाला. नम्र स्वभावाचा आहे मंदेसारखाच.” आई उत्तरली.
“मग बघायचा का माझ्यासाठी?” सुमीने अनाहुत प्रश्न विचारला न् सुमीच्या आई नि आजीने कपाळाला हात लावले.
(समाप्त)
–©️®️ सौ. गीता गजानन गरुड.