Ritbhatmarathi

Search
Close this search box.

©️®️ सौ. शिल्पा पराग कुलकर्णी

नीला आई-वडिलांची लाडकी एकुलती मुलगी. हुशार, सुंदर. दोन वर्षांपूर्वी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं तिने. आई-वडिलांची आता मुलं शोधण्याची मोहीम जोरदार सुरू होती. हा मुलगाच चांगला नाही. याचा पगारच कमी. एक ना दोन अनेक अडचणी. कधी तरी मुलाला सगळं पसंत तर यांना मुलगाच पसंत पडत नसे. आणि एक दिवस तो योग आला आणि नीलाचे लग्न ठरलं.
मुलगा बेंगलोरला नोकरी करत होता. नीलाचे माहेर-सासर एकाच गावात इचलकरंजीला होते. म्हणतात ना काखेत कळसा नि गावाला वळसा. एकाच गावातले असूनही हे लोक एकमेकांना ओळखत नव्हते.
मुलगा सुंदर, सुशील. नीलाची नी उन्मेशची जोडी म्हणजे जणू लक्ष्मी-नारायणाचा जोडाच. दृष्ट लागण्यासारखा. लग्न झाल्यानंतर नवर्‍याची रजा संपली. नीला आणि उन्मेश बेंगलोरलाच राहणार होते. तिथे उन्मेशचा फ्लॅटही होता. सासू-सासरे नीलाबरोबर 15 दिवस बेंगलोरला गेले. संसाराची सुरुवात करून देऊन ते दोघेही परत आले.
नीलाचा संसार सुरू झाला. उन्मेश सकाळी गेला की, संध्याकाळी परतायला उशीर व्हायचा. बेंगलोर शहर तिच्यासाठी नवखंच, त्यात शेजारी-पाजारी जास्त संंबध ठेवायचे नाहीत ही उन्मेशची सक्त ताकीद त्यामुळे घरातच तिला सगळा वेळ काढावा लागे.

नीलाचा नवा संसार सुरू झाला. ती माहेरी तशी लाडावलेली असल्याने तिला स्वयंपाकपाणी येत नव्हते. त्यामुळे सासू गेल्यानंतर तिची तारेवरची कसरत होत असते. पोळ्या करायला गेली की नकाशा, आमटीला कधी पाणी जास्त होई तर कधी घट्ट लगदा. भाजी कोणती आणावी ती कशी करावी याचे जास्त ज्ञान नसल्याने बर्‍याच वेळा उसळींशी सामना करावा लागे. तरी उन्मेश तिला खूपच समजून घेत होता. तशी नीला स्वभावाने खूपच चांगली होती. आपली चूक होतेय हे तिलाही समजत होतं, पण तिचाही नाइलाज होता. उन्मेश ही आज ना उद्या ही चांगलं करायला शिकेल या आशेने तिच्या चुकांवर पांघरूण घालत होता.
एक दिवस मात्र असा आला की तो जाम वैतागला.
‘‘नीला, तू जरा लक्ष देऊन स्वयंपाक करत जा.’’
‘‘हो. रे मलाही कळतंय, पण मी कितीही लक्ष घातलं तरी माझी चूक होतेच.’’
‘‘अग पण तू लग्नाआधी स्वयंपाक शिकून घ्यायला हवा होतास.’’
‘‘हो. मी शिकले होते. पण तेव्हा आई असायची बरोबर माझं काही चुकलं तर ती लगेच सावरून घ्यायची. काय चुकतंय आणि कसं चुकतंय हेच मला कळत नाहीये.’’
‘‘ते मला काही माहीत नाही. पण उद्यापासून तुला नीट स्वयंपाक यायला हवा म्हणजे हवा.’’ असं म्हणून उन्मेश रागारागातच बाहेर पडला.
बिचारी नीला. रडून रडून तिचे डोळे सुजले. तिला काही सुचेना. हॉलमध्ये दार सताड उघडं टाकून ती रडत बसली होती.
तिला जरा चाहूल लागल्यासारखं वाटलं म्हणून तिनं सहज वर पाहिलं. तर शेजारच्या ब्लॉकमधील काकू तिच्याकडे पाहत उभ्या होत्या. नीला संकोचली.
‘‘काकू, काही हवं होतं का?’’
‘‘नाही गं. तू अशी का बसली आहेस? आणि डोळे किती सुजले आहेत.’’
‘‘काही नाही काकू. आईची आठवण आली.’’
काकू खूपच हुशार होत्या. आत आल्या. नीलाचा हात हातात घेत म्हणाल्या,
‘‘आज भांडण झालं वाटतं.’’
नीला काही बोलली नाही, पण आता तिला हुंदका आवरला नाही. तिने सर्व कहाणी काकूंना सांगितली.
काकू म्हणाल्या, ‘‘हात्तिच्या एवढंच ना? तू काही काळजी करू नकोस.’’
‘‘हे बघ उद्यापासून नको अत्तापासून मी तुला शिकवते स्वयंपाक कसा करायचा ते. असं कर 4 वाजता मी येते. आपण संध्याकाळचा स्वयंपाक करू.’’
नीलाला हायसं वाटलं. तिला जरा उत्साह वाटला. ती म्हणाली, ‘‘काकू, अगदी आईप्रमाणे तुम्ही धावून आलात. मी इतके दिवस तुम्ही शेजारी आहात, पण एक शब्दही तुमच्याशी बोलले नाही. याचे मला आता खरंच वाईट वाटते.’’
उन्मेशनेच तिला बजावून ठेवले होते की, शेजारी पाजारी उगाच बडबडत बसू नकोस. काकू गेल्या त्यांच्या पाठमोर्‍या मूर्तीकडे बघताना नीलाला आपली आईच आहे असा भास झाला.
ठरल्याप्रमाणे 4 वाजता काकू आल्या. नीलाने त्यांना आधी गरम गरम चहा दिला आणि दोघी कामाला लागल्या. कुकर लावताना किती पाणी घालायचे. इथपासून फोडणी कशी इथपर्यंतचे शिक्षण काकूंनी तिला दिले. छान चवदार वांग्याची भाजी काकूंच्या मदतीने तिने बनवली. डाळीची सुंदर आमटी आणि पोळ्या थोड्या वाकड्या तिकड्या झाल्या, पण सरावाने त्याही छान होतील असा दिलासा काकूंनी तिला दिला. आजची संध्याकाळ तरी भागली.
उद्या सकाळी मटकीची उसळ कर त्यासाठीच्या खास टिप्स काकूंनी तिला दिल्या आणि उन्मेश यायच्या आत त्या आपल्या घरी गेल्या. आपण सकाळी नीलावर रागावलो याची सल उन्मेशला होतीच. पण तरीही त्याचा राग काही जात नव्हता. तो जरा उशीरा आणि घुश्श्यातच घरी आला.
नीलाने दार उघडले. छान खमंग वास सुटला होता. आपण नक्की आपल्याच घरात आलोय ना असा प्रश्‍न त्याला पडला.
त्याने विचारले, ‘‘आई आलीय का? की तुझी आई आलीय?’’
नीला म्हणाली, ‘‘नाही कुणीच नाही. का बरं?’’
तो काही बोलला नाही.
हात पाय धुऊन होईपर्यंत नीलाने ताटं वाढली. भाजी, आमटी खाताना उन्मेशचे डोळे चकाकत होते. त्याला खूप आनंद झाला.
‘‘नीला, किती सुंदर स्वयंपाक केलायस? कसं जमलं तुला आज?’’ ती गप्प बसली आपलं हे गुपित फोडायचे नाही हे काकूंनी तिला सांगितलं होतं.
ती म्हणाली, ‘‘केला असाच.’’
‘‘रागावली आहेस का अजून? माझं चुकलंच ग सकाळी.’’
‘‘असुदे रे. आज तुला आनंदाने जेवताना बघून मी सगळं विसरून गेलेय.’’
आणि मग काकूंची आणि तिची छान दोस्ती झाली. त्यांच्याकडून तिने चांगला स्वयंपाक शिकवला. काकूंना पण तिची मदत होऊ लागली. कधी भाजी आणून दे, तर कधी फोन लावून दे. या गोष्टीत ती त्यांना मदत करू लागली.
आता नीला अगदी छान स्वयंपाक करू लागली होती. पण तिला स्वयंपाक कसा येऊ लागला याचे मात्र उन्मेशला कोडेच होते.
त्याला आजूबाजूच्या लोकांशी बोलणं, त्यांच्याशी ओळख वाढवणं अजिबात आवडत नव्हतं. त्यामुळे आपण हे काकूंकडून शिकलो हे सांगणं म्हणजे भांडणाला कारण.
पण एक दिवस ती उन्मेशला म्हणाली, ‘‘आज आपण खालच्या काका-काकूंना आपल्याकडे जेवायला बोलवूया.’’
उन्मेश म्हणाला, ‘‘कशाला? उगाच नसत्या उठाठेवी.’’
नीला म्हणाली, ‘‘उन्मेश, तुझे आई-बाबा पण तिकडे गावी एकटेच असतात. चार लोकांशी बोललं की त्यांनाही बरंच वाटत असेल ना? या काका-काकूंचा मुलगाही परदेशात आहे. आपण त्यांना बोलावलं तर त्यांनाही जरा बरं वाटेल.’’
तरी उन्मेशला काही पटेना. शेवटी नीला म्हणाली, ‘‘उन्मेश, मी आज जो काही स्वयंपाक शिकले ते त्या काकूंमुळेच.’’
उन्मेशला आश्‍चर्यच वाटलं. ‘‘काय सांगतेस?’’
‘‘हो. तुला आवडत नव्हतं म्हणून मी तुला काही न सांगता तू बाहेर पडलास की, त्यांच्याकडून सर्व शिकून घेत असे. काकूंनी मला आपल्या मुलीप्रमाणे सर्व शिकवलं. त्यात त्यांनाही आनंद मिळाला. आपली मुलगी असती तर आपणही तिला असंच शिकवलं असतं ना? या मायेपोटी त्यांनी मला शिकवलं. आज ती दोघं एकाकी जीवन जगत आहेत. आपणही नोकरीच्या निमित्ताने इकडे लांब आहोत. आपल्याला त्यांचा आधार होईल. त्यांना आपला आधार.’’
उन्मेशला आश्‍चर्यच वाटलं आपण असा विचार कधी केलाच नाही. तसं त्याला मित्र मंडळ होतं. पण शेजारी पाजारी गप्पा म्हणजे नसत्या उठाठेवी असा त्याचा समज होता. त्याची चूक त्याला उमगली. आणि स्वत: जाऊन काका-काकूंना जेवणाचं आमंत्रण देऊन आला.
काका-काकूंना मुलाचा आधार वाटला. तर नीलाला आई-वडिलांचा आधार!
सौ. शिल्पा पराग कुलकर्णी

====================

फोटो साभार – गूगल

तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा.

कथा आवडल्यास आमच्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.

फेसबुक पेज : https://www.facebook.com/ritbhatmarati/

Share your love
Facebook
Twitter