Skip to content Skip to sidebar Skip to footer

९० च्या दशकातील गंमती जमती….90’s Memories

साधारण आज ३०-४० तले पोरं म्हणजे ९० च्या दशकातले पोरं. त्यावेळचा काळ आणि आजचा काळ आणि आजची मुलं ह्यात फार अंतर आहे. आपल्याकडे आपल्या मुलांना सांगण्यासाठी भरपूर गंमती जमती आहेत. त्यातीलच काही गंमती जमती खाली नमूद करायचा प्रयत्न आम्ही केला आहे.

१) त्या वेळी डीश टीव्ही किंवा सेटटॉप बॉक्स नसायचा. साधा टीव्ही ज्यावर फक्त दूरदर्शन यायचं. तुम्हाला बाकी चॅनेल्स बघायचे असल्यास लोकल व्हेंडर कडून केबल घ्यावी लागत. त्यातही सांगा कि कुणाचे पप्पा फक्त उन्हाळी आणि दिवाळी सुट्टीमध्येच केबल घ्यायचे. सुट्टी संपल्यावर आपण आपल्या बाबांना खूप कळवळीची विनंती करायचो कि आम्ही अभ्यास करू पण तुम्ही केबल नका काढू तरी बाबा काही ऐकत नसायचे आणि केबलची वायर गुंडाळून ठेवून द्यायचे. त्यातही माझ्यासारखे करामती पोरं पप्पा कंपनीमध्ये कामाला गेले कि गुंडाळलेली वायर पुन्हा टीव्हीला जोडायचो.

२) टीव्ही वरुनच लक्षात आलं कि कधी कधी नेटवर्क नसायचं तर टीव्ही वर चित्र दिसणं थांबायचं. आज मुलं फार स्मार्ट आहेत बरं का. टीव्ही बंद पडला कि आज आपण नेटवर्क नाहीये म्हणून सांगतो पण त्यावेळी छे!! आपल्याला कुठे एवढं कळायचं हो. टीव्ही वर चित्र यायचं बंद झालं कि आपण म्हणायचो “मुंग्या आल्या” . त्यावेळी टीव्ही वर मुंग्या यायच्या आणि आजकाल टीव्ही ला नेटवर्क नसतं किंवा लूज कॅनेक्शन चा प्रॉब्लेम असतो.

३)  आजकाल खेळांचे प्रकार बघायला मिळतात. Indoor Game आणि Outdoor Games. पण त्यावेळी आपण ४-५ पोरं जमलो कि पहिले एकमेकांना विचारायचो कि आत खेळायचं की बाहेर आणि सगळ्यांच्या संमतीने मग बाहेर मैदानी खेळ आणि घरात भातुकलीचे खेळ खेळायचो.

४) खेळावर आलोच आहोत तर मैदानी खेळामध्ये किती प्रकारचे खेळ आपण खेळायचो…. जसे कि विटी दांडू , पकडा पकडी , लिंगोरचा , जोडीसाखळी, धप्पा, लोखंडसाखळी आणि बरेच काही. मुलींमध्ये तर टिपरी लंगडी हा खेळ खूप कॉमन होता. कुणी जरी नसलं खेळायला तर मग लंगडी शिवाय ऑप्शन नसायचा. मग ५ व्या टप्प्यापर्यंत टिपरी जाण्यासाठी पोरी दूर दूर पर्यंत चांगली टिपरी शोधायला जात. त्यातही मोठी टिपरी, छोटी टिपरी किंवा टिपरीचा आकार ह्या वरून अंदाज लागायचा कि कोणती टिपरी शेवटच्या टप्प्यापर्यंत सहज जाईन.

५) पेप्सीकोला आठवतो का? २५ पैशापासून चालू होणारा पेप्सीकोला २ रुपयांपर्यंत मिळायचा. मग त्यातही रंगबेरंगी प्रकार आणि पैशांनुसार वेगवेगळे आकार. बाबा उन्हाळा सुरु झाला कि फ्रिज मध्ये आणून ठेवायचे. मग कुठल्या दिवशी कुठल्या रंगाचा पेप्सीकोला खायचा हे ठरलेलं असायचं. काय मज्जा यायची चोखायला!! 

६) उन्हाळी सुट्टयांमध्ये दिवसभर बाहेरच हुंदडायचो पण त्या वेळी कसलं सन टँनिंग आणि कसली धूळमाती.  भर दिवसा सूर्य डोक्यावर असला तरी बाहेर मैदानी खेळ खेळायचो आणि टॅन होयची फिकीर नसायची.

७) त्यावेळी ए .सी . हा प्रकार फक्त श्रीमंतांकडे पाहायला मिळायचा. आपल्याकडे फक्त पंख असायचा. त्यातही भर दिवसा उन्हाळ्यात लाईट गेली कि एखाद्या खिडकीचा पडदा उडालेला दिसला की त्या उडणाऱ्या पडद्याच्या खाली झोपायचं आणि मस्त गरम हवेचा आनंद घ्यायचा.

८) आजकाल रेड़ीमेड कोल्ड्रिंक्स मिळतात पण त्याकाळी स्वतःच्या हाताने बनवलेल्या रसनाची चव काही वेगळीच लागायची.

९) आजकाल मोठमोठ्या  कॅडबरी सर्रास मिळतात पण त्यावेळी ५० पैशाचं ते लाल रंगांच्या कागदात गुंडाळलेलं पार्लेचं चॉकोलेट जरी मिळालं तरी काय आनंद होयचा आणि आनंद अजून द्विगुणित होयचा, हातगाडीवरची ती १ रुपयांची मलाई कुल्फी किंवा ते रंगेबिरंगी केसर, पिस्ताचं आईस्क्रिम खाऊन.  

१०) बर्गर, पिझ्झा तर माहीतच नव्हता. आईकडे खूपच हट्ट केल्यावर ती हातगाडीवरची १ प्लेट पाणीपुरी किंवा रगडापॅटिस  मिळायचा. पण त्यातही फार समाधान मिळायचं.

११) आईने उन्हाळी काम करायला घेतलं कि चाळीतल्या ४ बायकांना मदतीला बोलावून घायची आणि त्यात आपली चिमुरड्यांची लुडबुड. मदतीपेक्षा तांदळाचे पापड असतील तर पापड बनवण्यापेक्षा पापडाचे उंडेच फस्त करायचो. आणि कुर्डयांचा तो चीक कसा विसरणार. आईने केलेल्या त्या गोड चिकाची चव अजूनसुद्धा जिभेवर रेंगाळते.

१२) आताच्या मुलांना सगळ्या गोष्टी किती पटकन आणि सहज मिळतात ना. आजकाल लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांकडे सिझन नुसार कपड्यांचे कलेक्शन असतात. पण त्यावेळी वर्षातून फक्त दोनदा कपडे मिळायचे. एकदा दिवाळीत आणि दुसरे वाढदिवसाच्या दिवशी आणि तेव्हा त्यात जो आनंद मिळायचा तो आता कपाटभरुन आणि सहज मिळालेल्या कपड्यांमध्ये नाही मिळत.

१३) आता स्मार्टफोन आले आणि घरोघरी होमथेटर आले पण लोकांकडे आवडीचे गाणे ऐकायला टाईम नाही. तेव्हा रेडिओ असायचे आणि रेडिओ मिर्चीवरची ती गाणी आणि पुढच्या गाण्याचा सस्पेन्स….वाह्ह काही वेगळीच मज्जा असायची. आई कामं करता करता रेडिओ आपला लावायची आणि गाणी गुणगुणत तिची आपली कामं चालायची. सोबत आपलं आवडीचं एखादं गाणं लागलं तर कामच झालं मग आपणही सुरु व्हायचो आणि आईपण मग आपल्याला साथ म्हणून गाणी गुणगुणायची.

अशा बऱ्याच आठवणी आहेत आणि सगळ्या आठवणी सांगायच्या झाल्या तर २-३ लेखही पुरणार नाही. त्या मुले ह्या लेखात एवढंच. जर तुमच्याही ह्या व्यतिरिक्त काही आठवणी असतील तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. 

=================

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.