Skip to content Skip to sidebar Skip to footer

जाणून घ्या कोण आहेत आठ चिरंजीवी! कथा अशा व्यक्तींची जे सदैव जिवित आहेत…

8 chiranjeevi names: जाणून घ्या कोण आहेत आठ चिरंजीवी! कथा अशा व्यक्तींची जे सदैव जिवित आहेत..कोणी वरदानामुळे तर कोणी शाप भोगताहेत.

अश्वत्थामा बलिव्यासो हनूमांश्च विभीषण:।
कृप: परशुरामश्च सप्तएतै चिरजीविन:।।
सप्तैतान् संस्मरेन्नित्यं मार्कण्डेयमथाष्टमम्।
जीवेद्वर्षशतं सोपि सर्वव्याधिविवर्जित ।।

या श्लोकाचा अर्थ असा की- अश्वथामा, दैत्यराज राजा बळी, महर्षी वेद व्यास, महाबली हनुमान, रामभक्त बिभीषण, मुनी कृपाचार्य, ब्रह्मर्षि परशुराम व मार्कण्डेय ऋषी हे आठ चिरंजीवी आहेत.  ज्या व्यक्ती या आठ चीरंजीवींचे रोज पहाटे उठून स्मरण करतात त्यांच्या साऱ्या व्याधी, रोग, दु:ख यांचा अंत होतो व त्या व्यक्ती शतायुषी होतात.

मनुष्याचा देह हा नश्वर आहे. आत्मा अमर आहे. तो एका देहातून दुसऱ्या देहात ठराविक कालावधींसाठी प्रवास करत असतो. हे झाले सामान्य माणसांसंबंधी परंतु पुराणात उल्लेखल्यानुसार आठ अशा व्यक्ती आहेत ज्या चिरंजीव आहेत. या लेखात आपण त्या व्यक्तींची ओळख करून घेऊ.

अश्वत्थामा हा कौरवपांडवांचे गुरू द्रोणाचार्य यांचा पुत्र. त्याचे बालपण फारच हलाखीत गेले. दूध म्हणून माता कुपी त्याला तांदूळपीठात पाणी घालून भरवत होती. द्रोणाचार्य आपल्या गरीबीने व्यथित होऊन बालमित्र द्रुपदाकडे गेले असता, तिथे त्यांचा अपमान झाला.

तेथून ते हस्तिनापूरात आले. तिथे त्यांना कौरवपांडवांना धनुर्विद्या शिकवण्यासाठी नियुक्त केले होते. अश्वत्थामाही कौरवपांडवांसोबत शिकत होता. तो अर्जुनाच्या तोडीचा धनुर्धर होता.

युद्धात गुरु द्रोणाचार्य व अश्वत्थामा कौरवांच्या बाजूने लढत होते. द्रोणाचार्याच्या म्रुत्युने व्यथित होऊन अस्वत्थामाने नारायणस्त्र चालवले होते.

गदायुद्धात जेव्हा भीमाने दुर्योधनाच्या मांड्या फोडून त्याला मरणासन्न अवस्थेत सोडून दिले होते तेव्हा तिथे अश्वत्थामा, कृतवर्मा व कृपाचार्य आले. दुर्योधनाची ती अवस्था पाहून अश्वत्थामा खूप क्रोधीत झाला व याचा पांडवांकडून बदला घ्यायची त्याने प्रतिज्ञा केली.

दुर्योधनाच्या आज्ञेने कृपाचार्यांनी अश्वत्थामाला कौरवसेनेचा सेनापती केले. युद्ध सुरु असताना एका रात्री अश्वत्थामा पांडवांच्या सैन्यात शिरला आणि त्याने दृष्टद्युम्नाचा वध केला. पांडव सेनेतील शिखंडी, युद्धमन्यु आणि उत्तमौजससह अनेकांना त्याने मारून टाकले.
पांडव झोपले आहेत असे समजून त्याने पाच झोपलेल्या व्यक्तींवर हल्ला केला आणि त्यांचा शिरच्छेद केला. पण ते पांडव नसून त्यांची म्हणजेच द्रौपदीची पाच मुले होती.

राजकुमारांच्या म्रुत्युचे पांडवांना अतीव दु:ख झाले. क्रोधीत होऊन अर्जुनाने अश्वत्थामावर बह्मास्त्र सोडले त्यावर प्रत्युत्तर म्हणून अश्वत्थामानेही बह्मास्त्र सोडले.

वेद व्यासांच्या आदेशावरून अर्जुनाने आपले अस्त्र माघारी घेतले पण क्रोधाने उन्मत्त झालेल्या अश्वत्थामाने पांडवांचा निर्वंश करण्याच्या हेतूने अभिमन्यूची पत्नी  उत्तरा जी गर्भवती होती तिच्या उदरात ते सोडले. श्रीकृष्णाने  उत्तरेचे व तिच्या उदरातल्या बाळाचे, परिक्षितचे रक्षण केले व अश्वत्थाम्यास शाप दिला की तो मरणाची भीक मागेल पण त्याला कधीही मरण येणार नाही. तो भटकत राहील.

त्याच्या जखमा त्याला त्याच्या कुकर्माची आठवण करून देतील. त्याच्या जखमांतून रक्त, पू वहात राहील व त्यामुळे त्याच्या देहास सदा दुर्गंधी येईल. कुणी त्याच्या बाजूस उभे रहाणार नाही. अशाप्रकारे अश्वत्थामाला चीरंजीवत्वाचे वरदान नव्हे तर बालहत्या केल्याबदद्लचा भगवान श्रीकृष्णांनी दिलेला तो शाप आहे.

बळीराजा हा राक्षस कुळातील होता. त्याने आपल्या शक्तीचा दुरुपयोग करून देव व ऋषींना सळो की पळो करून सोडले होते. तो त्रेल्योक्याचा सम्राट बनला होता. त्याला आपल्या दानशुरतेचाही दुराभिमान होता. भागवत पुराणातील वामनअवताराच्या कथेनुसार देव व दानव यांच्या युद्धात दानव/असुर धारातीर्थी पडत होते. राक्षसांचे कुळ नष्ट होईल या भितीने त्यांचे गुरु शुक्राचार्य यांनी त्यांना संजिवनी दिली व जीवंत केले.

गुरु  शुक्राचार्य यांनी असुरांचा राजा बळी यास अग्नीकडून दिव्य रथ, बाण, अभेद्य चिलखत, विविध अद्भूत शक्ती मिळवून दिल्या. यानंतर असुरांची शक्ती अनेकपटीने वाढली. असुरांच्या सैन्याने इंद्रावर हल्ला करण्याची तयारी केली.

बळीचे शंभर यज्ञ पूर्ण झाल्यावर तो इंद्र होईल, अशी इंद्राला भीती वाटू लागली म्हणून इंद्र श्रीविष्णूंना शरण गेले. श्रीविष्णूंनी त्यांना मदत करण्याचे वचन दिले.

वामन अवतारातील श्रीविष्णु बळी राजाकडे भिक्षा मागण्यास गेले. त्यांनी बळीकडे त्यांची तीन पावले मावतील एवढी जमीन मागितली. दानशूर बळीराजाने ती देऊ केली.

वामनाने पहिले पाऊल स्वर्गलोकावर , दुसरे पृथ्वीवर ठेवले, तिसरे कुठे ठेऊ विचारताच बळीराजा म्हणाला माझ्या डोक्यावर ठेवा..तसे ठेवून वामनाने बळी राजास पाताळात गाढले.

सर्व काही हरवून बसलेल्या बळीची वचनबद्धता पाहून वामनदेव खूष झाले व त्यांनी बळीराजास पाताळलोकाचे स्वामीपद बहाल केले  आणि आपण द्वारपालपद स्वीकारले.

महान ऋषी पराशर यांच्या सहवासात देवी सत्यवतीला (मत्स्यगंधा) कुमारिकेला पुत्रप्राप्ती झाली. या पुत्राचे नाव कृष्ण द्वैपायन ठेवण्यात आले. हेच व्यास मुनी. ते सहा वर्षांचे असतानाच त्यांनी आपल्या पित्याचे शिष्यत्व स्विकारले. व्यास मुनी अत्यंत बद्धीवान व तेजस्वी होते. पित्याकडून त्यांनी सर्वज्ञान प्राप्ती केली.  वेद व्यासांना चारही वेदांचे ज्ञान होते. व्यासांनी वेदांचे, सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद, ऋग्वेद असे चार विभाग केले.

जे लोक वेद वाचू, समजू शकत नाही त्यांच्यासाठी त्यांनी महाभारत कथिले ज्याचे लेखनिक स्वतः श्रीगणेश होते. महाभारतात वेदांची सर्व माहिती आहे. धर्मशास्त्र, नितीशास्त्र, उपासना आणि ज्ञान-विज्ञानाच्या सर्व बाबी महाभारतामध्ये आहेत.

वेद व्यासांनी अठरा पुराणांची रचना केली. हिंदू धर्माची सर्व अंगे व्यासांनी पुराणात सामावली आहेत.

विद्वानांसाठी त्यांनी वेदांत दर्शनाची रचना केली. या त्यांच्या महत्कार्यासाठी गुरुपौर्णिमेदिवशी महर्षी व्यासांची पूजा केली जाते.

विभीषण हा लंकाधिपती रावणाचा लहान भाऊ. तो रामभक्त होता. लंकेत राहून रामाची भक्ती करण्याच्या त्याच्या साहसाचे हनुमानाने कौतुक केले होते.

प्रभुरामाशी युद्ध करु नका असा सल्ला त्यांनी रावणाला दिला होता पण अहंकाराने उन्मत्त झालेल्या रावणाने विभीषणाची खिल्ली उडवली.

शेवटी मातेच्या सल्ल्यानुसार या युद्धापासून लंकेतील प्रजेचे रक्षण व्हावे याकरीता विभीषण रामास शरण गेले. राम व रावणाच्या युद्धात विभीषणाने रामाला साथ दिली  कारण प्रभुराम सत्याच्या बाजूने लढत होते. प्रभुरामाने रावणाचा पराभव केल्यानंतर लंकेचा उत्तराधिपती विभीषणाला बनवले व  त्यास रावणाची भार्या मंदोदरीशी विवाह करण्याचा सल्ला दिला.

मंदोदरीही काही काळाने विभीषणाशी विवाह करण्यास तयार झाली व त्यांचा विवाह झाला.

रामाने विभीषणाला चिरंजीवी रहाण्याचे व लोकांना सदमार्ग दाखविण्याचे वरदान दिले होते.

हनुमानाचे बालपणीचे नाव मारुती.

अंजलीपुत्र हनुमान याने लहान असताना लालबुंद सुर्यबिंबाकडे फळ म्हणून झेप घेतली होती. तेंव्हा इंद्रदेवाने त्यांच्यावर वज्र फेकून मारले होते. त्या प्रहाराने त्यांच्या जबड्याचा आकार बिघडला व त्यांना हनुमान हे नाव रुढ झाले.

वायुपुत्र हनुमान रामाचा परमभक्त होता. रामाच्या आदेशानुसार सीतामाईला भेटण्यासाठी तो लंकेस गेला होता.

अशोकवनातील सीतामाईला आपली ओळख दाखवण्यासाठी त्याने छाती फाडून आत वसलेले रामप्रभू दाखवले होते.

सीतामाईने हनुमानास चिरंजीवी होण्याचे म्हणजे सदैव जिवीत रहाण्याचे वरदान दिले होते.

कृपा व त्यांची बहीण कृपी हिला हस्तिनापूर सम्राट शांतनू याने दत्तक घेतले होतै.
कृपाचार्य हे महाभारतातील हस्तिनापूर राज्याचे कुलगुरू होते. त्यामुळे ते कौरव-पांडवांचे आद्य गुरू होते. नंतरचे गुरू द्रोणाचार्य.

जेंव्हा अश्वत्थामाने बह्मार्स्त् परत घेण्याऐवजी अभिमन्यू पत्नी उत्तरेच्या उदराच्या दिशेने सोडले तेंव्हा श्रीकृष्णाने सुदर्शन चक्र सोडून त्या अस्त्रास रोखले व उत्तरा व तिच्या गर्भातील मुलाचा परिक्षिताचा जीव वाचवला.

त्याचसमयी भगवान श्रीकृष्णांनी परिक्षितास सर्व विद्या शिकविण्यासाठी  कृपाचार्य यांना त्याचे गुरु म्हणून नियुक्त केले व त्याकरता त्यांना चिरंजीवी रहाण्याचे वरदान दिले होते.

ऋषी जमदग्नी आणि रेणुकामाता यांची पाच मुले होती. त्यातील सर्वात लहान परशुराम होते.

रेणुकामाता पती जमदग्नी ऋषींसोबत रामश्रुंग पर्वतराजींत रहात होती. रेणुकामाता मलप्रभानदीवर स्नान करून झाले की तिथल्या वाळूचे मडके बनवून त्यात जमदग्नी ऋषींच्या धार्मिक कार्यांसाठी पाणी भरून आणत असे.

एकदा तिने काही गंधर्वयुगलांना जलक्रिडा करताना तिथे पाहिले व ते बघण्यात ती गुंग झाली. तिच्या मनात आले आपणही आपल्या पतीसोबत अशी जलक्रीडा करावी व ती त्या स्वप्नात रममाण झाली. ती भानावर आली तेंव्हा फार उशीर झाला होता..त्यामुळे तिला घरी पाणी न्हेण्यास उशीर झाला.

जमदग्नी ऋषींनी आपल्या दिव्यदृष्टीने जाणले, रेणुका काय पहाण्यात दंग होती ते. ऋषी क्रोधीत झाले व  त्यांनी आपल्या चार मुलांना मातेचा वध करण्याची आज्ञा केली. मुले स्वमातेचा वध करू शकले नाहीत त्यामुळे जमदग्नी ऋषींनी त्या चौघांचा वध केला. 

जमदग्नी यांचा सर्वात लहान पुत्र परशुराम याने पित्याच्या आज्ञेबरहुकुम स्वतःच्या मातेचा शिरच्छेद केला. त्यावर प्रसन्न होऊन जमदग्नी ऋषींनी त्यांना वर मागण्यास सांगितले असता त्यांनी पित्यास  रेणूका मातेस व त्यांच्या चारही भावांस पुन्हा जिवीत करण्यास सांगितले व जमदग्नी ऋषी पुन्हा कधी क्रोधीत होणार नाहीत हा वर ही मागितला.

जमदग्नी ऋषींनी तथास्तु म्हणताच माता रेणुका व परशुरामाचे बंधु पुन्हा जिवित झाले होते.

एकदा कार्तविर्य अर्जुन परशुरामाच्या घरच्या  कामधेनूचे वासरू घेऊन पळत असतानाचे दिसताच परशुरामांनी त्याच्या हजार भुजा कापून टाकल्या होत्या.

कार्तवीर्य अर्जुनाच्या वधाचा बदला त्याच्या मुलांनी जमदग्नी मुनींचा वध करून घेतला. क्षत्रियांचे हे नीच कृत्य बघून परशुराम खूप संतापले आणि त्यांनी कार्तवीर्य अर्जुनाच्या सर्व मुलांचा वध केला. ज्या ज्या राजांनी त्यांना साथ दिली होती, त्यांचाही परशुरामाने वध केला.

अशाप्रकारे परशुराम देवांनी २१ वेळा पृथ्वीला क्षत्रियहीन केले. परशुरामांचा हा संताप बघून साक्षात महर्षी ऋचिक यांनी प्रकट होऊन त्यांना हे नरसंहारी कृत्य करण्यापासून थांबवले. तेव्हा परशुरामाने क्षत्रियांना मारण्याचे बंद केले आणि संपूर्ण पृथ्वी ब्राम्हणांना दान केली आणि ते स्वतः महेंद्र पर्वतावर निवास करण्यासठी गेले.
हिंदु पुराणांनुसार आजही परशुराम जीवंत आहेत.

काही प्राचीन ग्रंथांत महादेवाचे परम भक्त मार्कंडेय ऋषी यांना दीर्घायुषी असल्याचे म्हटले आहे. त्यासंबंधी कथा अशी..

मृकण्डु ऋषी व मरुद्वति यांना मुल होत नव्हते. मृकण्डु ऋषींनी भगवान शिवाची आराधना केली. शिवशंकर प्रसन्न झाले व त्यांना म्हणाले,”तुम्हाला दोन विकल्प देतो. तुम्हाला जो पुत्र होईल तो एकतर ज्ञानी व धार्मिक होईल पण सोळा वर्ष एवढेच त्याचे आयुष्य असेल किंवा दुसरा आळशी व लोभी होईल पण तो दीर्घायुषी असेल.” मृकण्डु ऋषीनी ज्ञानी पण अल्पजीवी पुत्रास संमती दिली.

शिवाच्या वरदानाप्रमाणे मृकण्डु व मरुद्वती यांस पुत्रलाभ झाला. त्याचे नाव मार्कंडेय ठेवले. तो सोळा वर्षाचा होत आला तसे त्याला आपले मातापिता उदास दिसू लागले.

मार्कंडेयाने त्यांच्या उदासीचे कारण विचारताच त्यांनी तो अल्पायुषी असल्याचे त्यास सागितले.

मार्कंडेय नदीकाठी गेला. तिथे त्याने वाळूचे शिवलिंग बनवले व एका पायावर उभे राहून शिवाची आराधना करू लागला. यमाचे दूत मार्कंडेयाचे प्राण घेण्यास आले पण तो शिवभक्तीत लीन होता.

शेवटी यमराज स्वतः आले व त्यांनी आपला फास मार्कंडेयावर फेकला पण मार्कंडेयाने शिवलिंगास मिठी मारली व रडू लागला तेंव्हा तिथे भोलेनाथ प्रकट झाले व त्यांनी यमावर लाथ मारली. यमाचे प्राण गेले.

मार्कण्डेयाने शिवशंकरास यमामधे परत प्राण फुंकण्यास विनंती केली तेंव्हा शंकराने यमास पुन्हा जीवित केले. यमराजने शिवशंभूची माफी मागितली. यमराज निघून गेल्यानंतर शिवशंकरांनी मार्कंडेयास चिरंजीवी भव असा आशीर्वाद दिला.

शिवाची उपासना आणि महामृत्युंजय सिद्धीने ऋषी मार्कंडेय यांनी आपल्या अल्पायुष्यावर मात करून दीर्घायुष्य प्राप्त केले.

मार्कंडेय हे भारतातल्या पद्मशाली समाजाचे दैवत आहे.

समाप्त

©® गीता गरुड.

===========

नमस्कार वाचकहो🙏🙏,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Leave a Comment

error: