इम्युनिटी वाढवायची असल्यास हे पदार्थ नक्की ट्राय करा | 5 easy to cook recipes which can increase immune system

रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पारंपारिक पदार्थ (immunity booster recipes): डिसेंबर,जानेवारी म्हणजे थंडीचा मौसम..यात शरीरातील कफ वाढीस लागतो नं सर्दी,खोकला,ताप हे आजार डोकं वर काढतात. इम्युनिटी बुस्टरर्सच्या नावाखाली ग्राहकांच्या खिशाला चांगलाच चाप बसतो. अशावेळी घरातलेच जिन्नस वापरुन आपल्या आई,आजींच्या मार्गदर्शनाखाली करत आलेल्या पारंपारिक पदार्थांची कास धरली तर ते आर्थिकदृष्ट्या, शारिरिकद्रुष्ट्याही लाभदायक ठरेल. अशाच काही पारंपारिक पदार्थांच्या क्रुती खाली देत आहे.
1.तीळाचे लाडू:

साहित्य:
पांढरे तीळ/काळे तीळ – पाव किलो
सुके खोबरे – १ वाटी
शेंगदाणे – १ वाटी (50ग्राम)
डाळ्या – १ वाटी (50ग्राम)
चिकीचा गुळ – पाव किलो
तूप – १ चमचाभर
वेलची पूड , सुंठ – आवडीनुसार
कृती:
पाव किलो बिनापॉलिशचे तीळ आणून साफ करुन घ्या. गावरान काळे तीळ मिळाले तर आणखी उत्तम. मंद आचेवर हे तीळ परतत रहायचं. तीळ भाजले की परातीत काढून घ्यायचे.
एक वाटी सुक्या खोबऱ्याचा किस मंद आचेवर परतत रहायचा. किस सोनेरी झाला की तो तीळात घालायचा.
वाटीभर शेंगादाणे(50ग्राम) मंद आचेवर भाजून त्यांची सालं काढून खलबत्यात जाडसर कुटून घ्यायचे. तेही परातीतल्या तीळात घालायचं.
वाटीभर डाळ्या(50 ग्राम) जरा मंद आचेवर परतून खलबत्त्यात किंवा मिक्सरवर जाडसर फिरवून मिश्रणात घालायच्या.
वेलची बोंड तव्यावर गरम करुन थोड्याशा साखरेसोबत कुटून घ्यायची..यातच भाजलेल्या सुंठीचा तुकडा कुटायचा. ही वेलची,सुंठेची पुड चाळून मिश्रणात घालायची. उरलेला चुरा चहापत्तीत टाकावा. चहाला सुगंध छान येतो.
आता चमचाभर तुप कढईत गरम होऊ द्यायचं. त्यात चिरलेला पाव किलो चिकीचा गुळ घालायचा व ढवळत रहायचं. एका वाटीत पाणी घ्यायचं. गुळाचा थेंब पाण्यात टाकून पहायचा. गुळाचा थेंब फिसकटला तर अजून शिजू द्यायचं. परत थेंब पाण्यात टाकून पहायचं..गोळीसारखा एकाठिकाणी जमला की त्यात हे सारं तीळ,खोबरे,दाणे,डाळ्यांचं मिश्रण घालून परतायचं व कढई खाली उतरवून हाताला सोसेल तसे लाडू वळायला घ्यायचे. हाताला अधनंमधनं तुपाचा किंवा पाण्याचा स्पर्श करायचा कारण हात लाल होतात..अगदीच जमणार नसेल तर सरळ ते मिश्रण पसरट ताटात ओतायचं. वरतून प्लास्टीक ठेवून मिश्रण पसरवायचं व त्याच्या सुरीने गरम असतानाच चिक्या पाडायच्या.
फायदे:
तीळ,शेंगदाणे,गुळ,डाळ्या..हे सारे स्निग्ध घटक असल्याने आपल्या शरीरात उष्णता निर्माण करतात व थंडीमुळे होणाऱ्या पडसे,खोकला या आजारांपासून आपला बचाव होतो.
तीळातील कॅल्शियम (calcium),मॅग्नेशियम (magnesium) व फॉस्फरससारखे (phosphorus) घटक हाडांस पोषक ठरतात. तीळात फायबर व एंटीऑक्सिडंट्स (anti oxidants) उच्च प्रमाणात असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
2.कुळथाची पिठी
साहित्य:
गावरान कुळीथ/कुलथी/ – आवडीनुसार
धणे/धनिया – १ वाटी
मेथी, लवंग – चमचाभर
पाणी – २ वाटी
तिखट, मीठ – आवडीनुसार
कांदा – १
तेल – चमचाभर
ओला नारळ – पाव वाटी
कृती:
गावरान कुळीथ मंद आचेवर भाजून घ्यायचे. हे भाजत असताना कुडुमकुडुम खाणं बालगोपाळांना आवडतं.
भाजलेले कुळीथ धोतराच्या पानावर जातं मांडून त्यात भरडून घेतात. भरडून झाले की कुळीथ सुपात घेऊन पाखडतात म्हणजे सालं निघून जातात..राहिलेल्या डाळी जात्यावर दळतात. किलोभर कुळथाला वाटीभर धणे भाजून तेही दळून घेतात..
चमचाभर मेथी,लवंग याही भाजून दळतात म्हणजे पीठीला छान सुवास येतो. हे पीठ डब्यात भरुन ठेवतात. शहरात जातं नसतं..मग आयतं पीठ काही दुकानांतून मिळतं. भरवशाच्या दुकानातून ते आणावं.
पीठी करण्यासाठी दोन वाट्या पाण्यात दोन पोह्याचे चमचे कुळीथपीठ घालून ढवळून घ्यावं.
त्यातच तिखट,मीठ आवडीनुसार घालावं. कांदा बारीक चिरुन घ्यावा.
पातेलं तापत ठेवून त्यात चमचाभर तेल घालावं. तेल गरम होताच कांदा मंद आचेवर परतावा.
आता त्यात कुळथाच्या पीठीचं पाणी घालावं नि मंद आचेवर ढवळत रहावं. हळूहळू पीठी दाट होऊ लागते न् आत आत येतेयसी वाटते. आता त्यात दोन आमसुलं टाकावी नि ग्यास बंद करावा. आवडत असल्यास यात ओला नारळही पाव वाटी घालावा.
अशीच गोडी पिठीही करतात. गोड्या पिठीत तिखट घालत नाहीत. हिरव्या मिरच्या उभ्या चिरुन कांद्यासोबत परततात.
फायदे:
थंडीत कुळथाची पिठी उष्णता प्रदान करते. कुळथात असलेल्या तंतुमय पदार्थामुळे शौचास साफ होते. कुळथाचे सेवन शरीरातील मेद कमी करते. लोहाची कमतरता दूर करते. शरीरातील कफदोष कमी करते.
3.खापरोळ्या/रसपोळ्या

साहित्य:
जाडा तांदूळ – चार वाट्या
उडीदडाळ – एक वाटी
चणाडाळ – अर्धी वाटी
दोन पोह्यांचे चमचे मेथीदाणे
हळद – पावचमचा
ओलं नारळ – १
चारपाच वेलचीचे दाणे
वाटीभर पाण्यात भिजत घातलेलं दोन चहाचे चमचे जिरं
गूळ चवीनुसार
कृती:
हा पदार्थ प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पीठं वापरुन करतात.मी इथे तळकोकणातली पद्धत सांगते.
चार वाट्या जाडा तांदूळ,एक वाटी उडीदडाळ,अर्धी वाटी चणाडाळ, दोन पोह्यांचे चमचे मेथीदाणे हे सारं दोनतीन पाण्याने धुवून दुपारीच भिजत ठेवायचं. साताठ तासाने ते उपसून थोडं थोडं पाणी घालून वाटून घ्यायचं. हे मिश्रण खोलगट टोपात ओतून हाताने चांगलं ढवळायचं.
यात पावचमचा हळद घालायची. काहीजणं यात वाटताना चार मिरी,चार लवंगा,एखाद दालचिनीचा तुकडा घालतात..पण हे ज्याच्यात्याच्या आवडीवर व ऑप्शनल आहे. पीठाचं भांड झाकून उबदार ठिकाणी ठेवून द्यावं.
सकाळी पीठ आलेलं असतं. बीडाचा तवा ग्यासवर गरम व्हायला ठेवायचा..नसल्यास निर्लेपचा चालतो. कांद्याचं बोंड कापून त्याचा पुढचा भाग तेलात बुडवून तव्याला तेल लावावं..आता त्यावर डावाने पीठ ओतून गोलाकार पसरवावं..मधेमधे भोकं पडतात. एक सेकंद झाकण ठेवावं नि काढावं. छान पावासारख्या हलक्या पोळ्या होतात.
परतून थोडा वेळ बिड्यावरच ठेवावी नि चाळणीत काढावी म्हणजे खाली ऊब जमा होणार नाही. अशाच पीवळ्याधम्म पोळ्या काढाव्या. लोणचं,चहा,चटणी यांसोबत करताकरता काही संपतात.
आता नारळाचा रस करायला घ्यावा. शक्यतो ताजा नारळ हवा. जास्त जुन नको. त्याचं खोबरं मऊ पडतं. नारळ खवून झाला की आवडीनुसार गुळ किसून घ्यावा.
नारळाचा चव, चारपाच वेलचीचे दाणे, वाटीभर पाण्यात भिजत घातलेलं दोन चहाचे चमचे जिरं ( पाणी गाळून)हे सारं मिक्सरमधे थोडं पाणी घालून वाटून घ्यावं.
मलमलच्या कापडात हा चव घेऊन स्टीलच्या टोपात गाळून घ्यावा. परत एकदा चव थोडं पाणी घालून वाटून,गाळून घ्यावा. किंचीत मिठाची कणी घालावी. गुळ घालून हाताने चुरावं. परत एकदा हवं असल्यास मलमलच्या फडक्याने गाळावा.
हा रस जास्तवेळ टिकत नाही. जेव्हा खाणार त्याआधीच करायला घ्यावा. खोलगट ताटात दोनचार पोळ्या ठेवून त्यावर रस ओतावा. पाच मिनटात पोळ्या रस शोषून घेतात मग मांडी घालून खाली बसावं न् या पारंपारिक पदार्थाचं सेवन करावं. खाताना ब्रह्मानंदी टाळी लागते.
फायदे:
यात असणारे गुळ,खोबरं,मेथीदाणे,ऊडीदडाळ,चणाडाळ,सारंच उष्णतावर्धक,बलवर्धक आहे. वाढीवर असलेल्या मुलांसाठी हा पौष्टिक आहार आहे. गुळ,सर्दीखोकल्यापासून बचावासाठी प्रभावी आहे. गुळाच्या सेवनाने हाडे मजबूत होतात. पोटाच्या समस्या दूर होतात. तांदूळामुळे शरीरास आवश्यक उर्जा मिळते. डाळ्या प्रथिनांचे उत्तम स्त्रोत आहेत.
4.पोह्याचे लाडू:
साहित्य:
जाड पोहे – अर्धा किलो
वाटीभर काजू,बदाम, अक्रोड, खारीक
सुकं खोबरं – एक वाटी
शेंगदाणे – १ वाटी
गुळ – अंदाजे दिडपाव
तूप – २ वाटी
जायफळ – पाव
वेलची – ४-५ नग
कृती:
अर्धा किलो जाड पोहे आणावेत. हातसडीचे लालसर मिळाल्यास अतिउत्तम.
पोहे चाळून घ्यावे व मंद आचेवर परतत रहावे. छान कुरकुरीत झाले की परातीत काढून घ्यावे.
वाटीभर काजू,बदाम,अक्रोड,खारीक हे गरम करुन खलबत्त्यात कुटून घ्यावे.
एक वाटी सुकं खोबरं किसून ते मंद आचेवर परतून घ्यावं. वाटीभर शेंगदाणे भाजून, सालं काढून कुटून घ्यावे.
गुळ अंदाजे दिडपाव बारीक चिरुनघ्यावा. पोहे मिक्सरला फिरवून घ्यावे. त्यातच गुळ टाकून परत एकदा फिरवून घ्यावं..गुळ पोह्याच्या पीठात एकजीव होतो.
आता परातीत पोहेगुळपीठ,दाण्याचं कुट,सुक्यामेव्याचं कुट,सुक्या खोबऱ्याचा किस..सारं एकत्र करावं..
यात पाव जायफळ किसून घालावं. चार वेलचीची पावडर करुन घालावी.
दोन वाटी तुप गरम करावं व लागेल तसं मिश्रणात घालावं..हाताने लाडू वळता येतील इतपतच तुप घालावं नि लाडू बांधायला घ्यावेत.
फायदे:
सुकामेवा,दाणे,खोबरं,पोहे,तुप हे सारं थंडीत शरीरास आवश्यक ती उर्जा देण्याचं काम करतात. पोह्यात असलेल्या लोहामुळे हिमोग्लोबिनची निर्मिती सुधारते. रक्तात ऑक्सिजनचे प्रमाण सुधारल्याने रोगप्रतिकारक शक्ती सुधारते.
5.भाजणीचे वडे:

साहित्य:
जाडा तांदूळ – एक किलो
ज्वारी – पाव किलो
चणाडाळ – 100 ग्राम
गहू – 100 ग्राम
उडीद डाळ – 100 ग्राम
धणे – 50 ग्राम
मेथीदाणे – ४ चमचे
दहा मिरीदाणे
पाचसहा लवंगा
एखाद दालचिनीचा तुकडा
उकडा तांदूळ – १०० ग्राम
हळद – पाव चमचा
मीठ चवीनुसार
कृती:
हे खरेतर बारमाही खाण्याजोगे आहेत. एक किलो जाडा तांदूळ आणून स्वच्छ धुवून एखाद्या पातळावर सावलीत वाळवावा.
कढईत पाव किलो ज्वारी घेऊन मंद आचेवर भाजावी. ती परातीत ओतून घ्यावी.
चणाडाळ 100 ग्राम मंद आचेवर भाजून परातीत काढावी. 100 ग्राम गहू,100 ग्राम उडीद डाळ मंद आचेवर भाजून घ्यावी.
आता यात 50 ग्राम धणे मंद आचेवर भाजून घालावे. चार चहाचे चमचे मेथीदाणे,दहा मिरीदाणे,पाचसहा लवंगा,एखाद दालचिनीचा तुकडा हे सारं भाजून घालावं.
शंभर ग्राम उकडा तांदूळ(कोकणी दुकानात लालसर मिळतो तो) मंद आचेवर भाजून घ्यावा. आता धुवून वाळवलेले तांदूळ थोडेथोडे घेऊन मंदाग्नीवर भाजून घ्यावेत..हे सारं मिश्रण चक्कीवरुन दळून आणून डब्यात भरुन ठेवावं.
वडे करताना पातेलीत पाणी गरम करावं. त्यात पाव चमचा हळद व थोडं मीठ घालावं. पातेलीत लागेल तेवढं पीठ घेऊन..या गरम पाण्याने ते मळून प्लास्टीक पिशवीत प्याक करुन तीनेक तास ठेवावं.
वडे करताना एका दुधपिशवीला फाडून, स्वच्छ धुवून पुसून आतल्या बाजूने तेल लावावं. छोटा गोळा घेऊन तो दोन प्लास्टीकच्या मधे ठेवून वरतून बोटाने गोलाकार थापावं.
कढईत तेल तापत ठेवावं. त्यात हे वडे दोन दोन सोडून तळून घ्यावेत. अगदी खमंग लागतात. दुसऱ्या दिवशी हे गरम करुन खाण्याची मजा औरच. शाकाहारी जेवणात सफेदवटाण्याच्या उसळीसोबत,काळ्या वटाण्याच्या सांबाऱ्यासोबत हे वडे खातात. मांसाहारी जेवणात सागोतीवडे फेमस आहेत. दुसऱ्यादिवशी चहा नि वडे खाणे म्हणजे स्वर्गानंद.
फायदे:
चणाडाळ,ऊडीदडाळ,मेथ्या,तांदूळ,गहू यांच्या भाजणीने बनलेले हे वडे स्वादिष्ट,रुचकर व उर्जा प्रदान करणारे आहेत. डाळींमधून प्रोटीन्स मिळते मलावरोध होत नाही. शरीराती लोहाची कमतरता दूर होते.
——————————————————————-
©️®️ सौ.गीता गजानन गरुड.
===============