Skip to content Skip to sidebar Skip to footer

२६ जानेवारी….

©️®️ मिथून संकपाळ

तालुक्याच्या ठिकाणापासून जेमतेम ५-६ किलोमीटर अंतरावर असलेलं गाव.. गावाच्या सुरुवातीला लागणारा वड म्हणजेच गावाचं एस टी स्टँड. दिवसभरात येता जाता ७-८ वेळा एस टी तिथं थांबायची आणि गावातल्या लोकांना तालुक्याला किंवा इतर ठिकाणी जाता येई. बाकी वेळी मग स्वतःची दुचाकी नाहीतर सायकल हेच वाहन उपयोगी पडायचं..
गावात ३-४ बंगले सोडले तर बाकी घरं कौलारू होती, म्हणजेच अगदी सर्वसामान्य लोकं त्या गावात वास्तव्यास होती. त्याहूनही दीन लोकं मग गावाच्या थोडं बाहेर, किंवा शेतामध्ये एखादं डागडुजी केलेलं घर, झोपडी यातच आपला संसार चालवत होते. त्यापैकीच एक शामराव..!! दिवसभर काबाडकष्ट करायचं आणि मिळेल ती मीठ भाकरी खाऊन जगायचं, त्याची बायको कांचन पण त्याला संसारात हातभार लावायची. ४-५ घराची धुणी भांडी करून स्वतःच्या घरचही सारं करायची. इतकी परवड होत असून सुद्धा दोघं मिळून आपल्या मुलाचा व्यवस्थित सांभाळ करायचे. १० वर्षांचा बाळू आता पाचव्या इयत्तेत शिकत होता. आई वडील दिवसभर काम करायचे आणि बाळू शाळेत जायचा. संध्याकाळी शाळेतून घरी गेला की थोडा वेळ खेळायचं आणि अभ्यासाला लागायचं. आई वडील घरी आले की त्यांना शाळेतलं सगळं सांगायचं, केलेला अभ्यास वाचून दाखवायचा असं हे रोजचं ठरलेलं. आपण दोघं जरी जेमतेम शिकलो असलो तरी मुलाला चांगलं शिकता यावं या विचाराचे होते दोघेही. कष्ट करून घरी आल्यावर, मुलाचा शिकण्यातला उत्साह पाहून दोघांची मरगळ कुठल्या कुठे निघून जायची. तर असा हा त्यांचा संसार नीट सुरू होता, पण गरिबांच्या घरी दुःख आणि संकटं कधीच चुकली नाहीत.

त्या दिवशी बाळू शाळेतून घरी आला आणि खेळून झाल्यावर नेहमी प्रमाणे अभ्यास करू लागला. साधारण ७ वाजले असतील, शामराव आणि कांचन घरी पोचले. थोड्या वेळाने कांचन आपल्या स्वयंपाकात लागली आणि शामराव बाळूजवळ येवून बसला.
“काय मग, आज काय झालं शाळत?”
“आज लै मज्जा आली, सांगू का?”
भाकरी थापत थापत कांचन म्हणाली, “नको सांगू म्हटलं तर ऐकणार हाईस का? सांग”
कांचन आणि शामराव दोघेही हसू लागले, बाळूच्या बोलक्या स्वभावापुढे त्यांचं काहीच चालत नसत.
“आज आमच्या शाळत नोटीस आली व्हती, तालुक्याला राष्ट्रगीत स्पर्धा हाय, आणि आमच्या शाळेतनं दोन गट पाठवणार हाईत.. मोठा गट आणि छोटा गट..”
“बरं, चांगलं हाय की मग..” मध्येच शामराव म्हणाला
“व्हय, आणि बाईंनी मला सांगितलं हाय छोट्या गटात यायला”
“अरं वा..” कांचन चेहऱ्यावर हसू आणत म्हणाली.
शामराव पण बाळूच्या पाठीवर थाप मारत म्हणाला, “म्हणजे बाळूशेठ आता तालुक्याला जाणार, ते पण स्पर्धेमधी.”
“व्हय तर.. आणि मला सगळ्यात पुढं उभा केलंय राष्ट्रगीत म्हणायला”
“वा वा वा..” असं म्हणत शामरावने त्याला अजूनच जवळ घेतलं आणि कवटाळलं, ते पाहून कांचनला पण गहिवरून आलं. डोळ्यातलं पाणी अलगद पुसत ती म्हणाली,
“झालं असल बाप लेकाचं कवटाळून तर बसा जेवायला”
बाळू पटकन हात धुवून आला अन् आईच्या पदराला हात पुसत म्हणाला, “बाईंनी शाळेचा नवा ड्रेस आणायला सांगितलाय”
त्याच्या या वाक्यावर कांचन कपाळावर आठ्या आणत म्हणाली,
“आता त्यो आणि कशापायी?”
“अग आई, तालुक्याला स्पर्धा हाय आणि त्यात सगळ्यात पुढं उभा राहायचा आहे मी”
“बरं, बघू आपण, बस आता जेवायला” असं म्हणत शामराव ने त्याला जेवायला बसवलं. जेवता जेवता शामराव आणि कांचन एकमेकाकडे बघत राहिले. नजरेतूनच एक गुप्त संवाद जणू दोघात चालू होता आणि विषय होता – बाळूचा नवा ड्रेस. दोघांनाही तोच प्रश्न पडला होता, आता हा खर्च कसा करायचा.
“कधी हाय तुझी स्पर्धा?” – शामराव.
“२६ तारखेला.. २६ जानेवारी हाय न्हव का, म्हणून तर राष्ट्रगीत स्पर्धा हाय”
“म्हणजे ३-४ दिवसच राहिलं की” – कांचन.
जेवणं झाली आणि बाळू खुशीतच झोपून गेला, ते दोघे मात्र विचारात गढून गेले.

दुसऱ्या दिवशी बाळू शाळेत गेला..
“काय व.. कसं करायचं बाळूच्या कापडाच?”
“आज बघतो मालकाला बोलून काय सोय होती का”
“व्हय, एवढ्या बारीला करा म्हणावं मदत. पोरगं लै खुश हाय”
“बरं, जातो कामावर आणि बघतो बोलून. सांगतो सांजला घरी आल्यावर” असं म्हणून तो आपल्या सायकलने कामावर निघून गेला आणि पाठोपाठ कांचन पण तिच्या कामांना निघून गेली.
संध्याकाळी नेहमीप्रमाणे बाळू आला.. खेळ, अभ्यास झाला. शामराव आणि कांचन पण आले. कांचन आपल्या कामात लागली, शामराव आज शांत होता. हात पाय धुवून तो बाळूकडे येतच होता, तोवर बाळूनेच विषयाला सुरुवात केली,
“बाबा, कवा आणणार ड्रेस?”
कांचनला पण याचं उत्तर हवं होतंच म्हणून ती पण शामराव काय उत्तर देतो त्याकडे लक्ष देऊन होती.
“आणायचं रे, अजुन वेळ हाय”.
एवढ्या उत्तरात कांचन समजून गेली की आज काही सोय झाली नाही पैशाची. बाळू मात्र पटकन म्हणाला,
“जास्त दिवस न्हाई उरले, आज २३ तारीख हाय. २४ आणि २५ दोनच दिवस हायीत.”
शामराव आणि कांचन एकमेकाकडे बघत राहीले, बाळूच्या प्रश्नावर आता तरी काहीच उत्तर नव्हतं त्यांचाकडं. शेवटी कांचन विषय बदलत म्हणाली,
“तू आधी तुझं पाठ झालंय का बघ, नुसतं कापडं घालून होणार हाय का सगळं”
एवढं ऐकताच बाळू खाडकन उभा राहिला आणि त्या दोघांना सुद्धा उभं राहायला सांगितलं, आणि तोंडपाठ असलेलं राष्ट्रगीत सुरात म्हणून दाखवलं.. त्याचं पाठांतर ऐकून कांचन अवाक् झाली तर शामरावने त्याला उचलून कडेवर घेतलं. पुढे काय बोलावं दोघांनाही कळत नव्हतं. अशातच सारे जेवायला बसले आणि बाळू मात्र शाळेविषयी बोलत राहिला.

दुसऱ्या दिवशी सकाळी बाळू शाळेत गेला आणि पुन्हा हे दोघं बोलू लागले,
“आज पुन्हा एकदा बोलून बघतो मालकाला”
“काल काय म्हणाला होता मालक?”
“महिना अखेर हाय, पाहिजे तर १-२ तारखेला देतो म्हणत होता”
“आपल्याला तर आता नड हाय न्हव का”
“तेच त्याला म्हटलं, पण काय ऐकला न्हाई. आज परत एकदा बोलायला पाहिजे”
“मी पण कामावर २-३ ठिकाणी मागून बघते, उसनं पैसं मिळत्यात काय बघू”
“चाललं, बघ जरा तू पण शब्द टाकून. उगी पोरगं नाराज व्हायचं”
“व्हय, चला जाते” झपझप पावलं टाकत ती निघून गेली.
शामरावने सुद्धा जेवणाचा डबा सायकलला अडकवला आणि निघाला कामावर.
दिवसभरात अनेकवेळा तगादा लावून सुद्धा शामरावचा मालक काही पैसे देवू शकला नाही. हिरमुसल्या चेहऱ्याने संध्याकाळी घरी परतला, बाळू वाट पाहतच होता. शामराव सायकलला लावलेली पिशवी घेवून घरात आला, तसं बाळूने त्याच्या हातातील पिशवी हिसकावून घेतली. पिशवी शोधली पण जेवणाच्या रिकाम्या डब्या शिवाय काहीच दिसलं नाही..
“बाबा, आज पण ड्रेस न्हाई आणला?”
शामरावने कांचनकडं पाहिलं, तिची नजर खाली होती आणि शांत उभी होती. शामराव कळून चुकला होता की कांचनला सुद्धा पैशाची नड भागवता आली नव्हती.
“बाबा, सांग की. ड्रेस का न्हाई आणला?”
शामरावने बाळूला उचलून घेतलं, घट्ट मिठी मारली आणि हुंदका त्याला आवरता आला नाही. कांचनच्या डोळ्यातून सुद्धा कधीच गंगा जमुना वाहू लागल्या होत्या. बाळूला काही लक्षात येण्याआधीच दोघांनी स्वतःला सावरलं. शामराव त्याला कडेवरून खाली उतरवत म्हणाला,
“उद्या नक्की आणू हा तुझी कापडं”
“बघ हा बाबा, उद्या २५ तारीख हाय आणि परवा स्पर्धा हाय”
“होय रे बाळा, आणतो म्हटलं ना उद्या”
बाळू पुन्हा एकदा खुश होवून जेवायला बसला. कांचनला काहीच कळत नव्हतं की शामरावच्या मनात काय सुरु आहे, कसं काय त्यानं असं खात्रीने सांगितलं की उद्या नक्की कापडं घेवून येणार. त्यावर काहीच प्रश्न न करता ती काम करत राहिली. मनातून ती स्वतः कमजोर झाली होती कारण ती स्वतः मुलासाठी काही करू शकत नव्हती.. ही स्पर्धा पण काय नेमकी महिना संपायच्या वेळेस ठेवली, २६ जानेवारी म्हणं.. २६ जानेवारी जरा पुढल्या महिन्यात आला असता तर काय बिघडलं असतं.. असं अनेक विचार तिच्या डोक्यात घोळत होते. मुळात २६ जानेवारी हा दिवस २६ जानेवारीलाच येणार हे सुद्धा तिला बाळूच्या इच्छेपुढे कळत नव्हतं. उद्या काय आणि कसं होणार या काळजीत तिला रात्रभर झोप लागली नाही, सतत ती कुस बदलत राहिली, मध्येच उठून बाळूला आणि शामरवला बघायची. दोघे बाप लेक गाढ झोपेत होते, बाळूच्या चेहऱ्यावर झोपेत सुद्धा एक समाधान होते, ते पाहून कांचनच्या डोळ्यात अजूनच पाणी यायचं.. उद्या हेच समाधान आणि हसू दुःखात बदलू नये एवढीच तिची ईच्छा होती.

दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीपेक्षा लवकरच शामराव कामावर निघाला, अगदी बाळूच्या आधीच. बाळू पण नेहमीसारखं आवरून शाळेत गेला आणि पाठोपाठ कांचन आपल्या कामावर.
शामराव कामावर पोचला खरा पण कामात लक्ष नव्हतं, मुलाला दिलेला शब्द त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. बापाने दिलेला शब्द खोटा ठरू शकतो, ही भावना त्याला बाळूच्या मनात आणू द्यायची नव्हती. पण त्यासाठी काय करावं त्याला सुचत नव्हतं. शेवटचा प्रयत्न म्हणून तो पुन्हा मालकाजवळ गेला,
“मालक, तेवढं बघा की पैशाचं काय तरी”
“अरे बाबा, आलास का पुन्हा, सांगितलं ना तुला आता न्हाई काय व्हायचं”
“पोराला सांगून आलोय जी, आजच्याला कापडं घेवून येतो म्हणून”
“पर मी काय करू तेच्यात, पहिल्यापासनच मी न्हाई म्हणून सांगितलं, माझंच पैसं अडकून हायीत.”
“पाहिजे तर पुढचा पगार जरा उशिरान द्या..”
“तो तर असबी उशिराच द्यावा लागणार हाय. सगळी सोंग घेता येतात बाबा पर पैशाचं न्हाई”
यावर काय बोलावं शामरावला कळत नव्हतं, तो निमूटपणे आपल्या कामाला लागला. आता मात्र त्याला स्वतःचा राग येवू लागला होता, बाळूचा उत्साही चेहरा आणि त्यानं म्हणून दाखवलेलं राष्ट्रगीत त्याला डोळ्यासमोर दिसू लागलं होतं.

संध्याकाळ झाली तसे कांचन घरी पोचली, बाळू अभ्यास करत बसला होता. ती आजपण शांत होती, रोजच्या प्रमाणे स्वयंपाकात लागली. बाळू सारखं उठून बाहेर डोकावून बघायचा, त्याची घालमेल कांचन ला समजत होती पण ती काहीच करू शकत नव्हती. तिलाही माहीत नव्हतं आज शामराव काय आणि कसं करणार होता..
“आई, बाबा आला..” बाळू दारातच उभा राहीला.
शामराव जसा जवळ आला, बाळूने पळत जावून त्याच्या हातातली पिशवी घेतली आणि पळत घरात आला. पिशवी उघडून पाहिली आणि त्याचा आनंद गगनात मावेना.. नवा ड्रेस पाहून तो अगदीच खुश झाला होता, अक्षरशः ड्रेस घेऊन नाचायला लागला. त्याचा आनंद पाहून कांचन सुद्धा खुश झाली, गेले २-३ दिवस डोक्यात चालू असलेलं विचारांचं वादळ आता शांत झालं होतं. शामराव मात्र शांत होता आणि बाळुकडे एकटक पाहत होता, न राहवून कांचनने त्याला विचारलं,
“काय झालं ओ, तोंड का पाडून हाईसा?”
“काय न्हाई झालं”
“आज उशीर बी लै केलासा यायला”
“हा, दुकानात गेलो होतो ना कापडं घ्यायला”
“बरं झालं बघा तेला आज कापडं आणली, खुश झालंय पोरगं. मालकानं पैशाची नड भागवली हे बाकी भारी झालं.”
“त्यानं न्हाई दिलं पैसं”
“मग, कुणी दिलं?”
“सायकल…” एवढं म्हणून तो मटकन खाली बसला. आताशी कांचनच्या लक्षात आलं की शामराव आज चालत घरी आला होता.
खूप हात पाय मारून काहीच नाही झालं तेव्हा त्याला ती सायकल विकावीच लागली. कांचन शामरावकडे बघत राहिली, तिला काय बोलावं काही कळत नव्हतं.. आनंद कसा क्षणिक असतो याचा तिला प्रत्यय आला होता. दोन मिनिटापूर्वी मुलाच्या आनंदाने खुश झालेली कांचन आता शामरावच्या दुःखात सहभागी झाली होती. मुलाच्या आनंदासाठी त्याने उचललेलं पाऊल जितकं कौतुकास्पद होतं तितकच त्याच्या स्वतःसाठी ते वेदनादायी होतं.

दुसरा दिवस उजाडला ज्याची वाट अतिशय आनंदाने बाळू पाहत होता.. २६ जानेवारी..!! मस्त आवरून नवा ड्रेस घालून बाळू शाळेत गेला आणि तिथून मग सर्वांसोबत तालुक्याला.
इकडे शामराव आज घरीच होता पण कांचन मात्र कामावर जाऊन आली. येताना कागदातून थोडी जिलेबी बांधून घेवून आली होती, अशीच कामावर कोणीतरी दिलेली. बाळूला खूप आवडायची जिलेबी, म्हणून मग त्याच्यासाठी ती घरी आणली होती.
संध्याकाळी बाळू धावतच घरी आला..
“आम्ही जिंकलो, आम्ही जिंकलो..” असा ओरडतच होता
शामराव त्याला थांबवत म्हणाला, “अर व्हय व्हय.. काय झालं सांग तरी नीट”
“बाबा, आमच्या शाळेचा पहिला नंबर आला”
कांचन खुश झाली त्याला पाहून, “गुणाचं ग लेकरू माझं, हे घे जिलबी खा”
“आणि ही पिशवी कसली रं ?” शामरावने विचारलं
“बाबा, बक्षीस हाय ते. गटातल्या सगळ्यांना मिळालं”
“बघू तरी काय मिळालं..” असं म्हणत शामरावने पिशवीत हात घालून आतली पिशवी बाहेर काढली.
शामराव आणि कांचन एकमेकाकडे बघतच राहिले, दोघांचेही भाव हरवले होते. कसं व्यक्त व्हावं त्यांना काही कळायला मार्ग नव्हता..
बाळू मात्र जिलेबी खात खात नाचू लागला,
“अजून एक ड्रेस मिळाला, आता मला २ नवीन ड्रेसsss”

— मिथून संकपाळ.

=====================

फोटो साभार – गूगल

तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा.

कथा आवडल्यास आमच्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.

फेसबुक पेज : https://www.facebook.com/ritbhatmarati/

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.