१२ ज्योतिर्लिंग आणि त्यांचे महत्व

12 jyotirlinga names in marathi आपल्याला तेहातिस कोटी देवांचा वारसा लाभलेला आहे. त्यामुळे आपण खूप श्रीमंत आहोत असे म्हणायला हरकत नाही.
प्रत्येकजण आपापल्या श्रद्धेनुसार कुळदेवतेला किंवा इतर देवांना मानतात. त्यांची सेवा करतात.
पण सगळ्यात लवकर प्रसन्न होणारे आणि हवे ते देणारे दैवत म्हणजे भोलेनाथ शंकर.
म्हणूनच त्यांना देवांचा देव असे म्हटले जात असावे. भगवान शंकराची आराधना करण्यासाठी श्रावण महिना पवित्र मानला जातो. म्हणूनच श्रावणात भगवान शंकराची खूप आठवण येते.
आपल्या या भोळ्या शंकराची अनेक मंदिरे देशात आणि देशाबाहेरही आहेत. यातील काही खास, पवित्र आणि जागृत देवस्थाने म्हणजेच बारा ज्योतिर्लिंग.
ज्योतिर्लिंग या शब्दाची फोड केल्यावर लक्षात येईल की यात दोन शब्द आहेत. एक म्हणजे जोती म्हणजे तेज प्रकाश आणि लिंग हे भगवान शंकराचे दिव्य रूप दाखवते. म्हणून ज्योतिर्लिंग या शब्दाचा अर्थ भगवान शंकराचे दिव्य रूप असा आहे.
ज्योतिर्लिंग म्हणजे अशी ठिकाणे जिथे भगवान शंकर प्रकट झाले ती ठिकाणे असा उल्लेख पुराणात आढळतो. वास्तविक, ज्योतिर्लिंग स्वयं अस्तित्वात आहे, म्हणजेच ज्योतिर्लिंग स्वतः प्रकट होते. शिवपुराणानुसार, त्या वेळी आकाशातून ज्योतीचे शरीर पृथ्वीवर पडले आणि त्यांच्यापासून संपूर्ण पृथ्वीवर प्रकाश पसरला. या मृतदेहांना बारा ज्योतिर्लिंगचे नाव देण्यात आले.
शिव महापुराणातील कोटिरुद्र संहिताच्या पहिल्या अध्यायात असे वर्णन आढळते, की जो कोणी बारा ज्योतिर्लिंगाची नावे रोज सकाळी आणि संध्याकाळी घेतो त्याची सात जान्माची पापे या लिंगाच्या केवळ स्मरणाने संपून जातात.
बारा ज्योतिर्लिंग कोणती आणि कुठे आहेत ते बघुया ..
- सोमनाथ वेरावळ, (गुजरात)
- मल्लिकार्जुन श्रीशैल्यम, (आंध्र प्रदेश)
- महाकालेश्वर उज्जैन (मध्य प्रदेश)
- ओंकारेश्वर ओंकार मांधाता (मध्य प्रदेश)
- वैजनाथ परळी (महाराष्ट्र)
- रामेश्वर रामेश्वर (तामिळनाडू)
- नागनाथ हिंगोली (महाराष्ट्र)
- विश्वेश्वर वाराणसी (उत्तर प्रदेश)
- घृष्णेश्वर औरंगाबाद (महाराष्ट्र)
- केदारेश्वर केदारनाथ (उत्तराखंड)
- त्र्यंबकेश्वर नाशिक (महाराष्ट्र)
- भीमाशंकर भीमाशंकर पुणे (महाराष्ट्र)
१. सोमनाथ :
गुजरात मधील सौराष्ट्रात वसलेले सोरटी सोमनाथ येथे महादेवाचे मंदिर आहे. हे बारा ज्योतिर्लिंग पैकी पाहिले स्थान आहे. प्राचीन धर्मस्थलात या मंदिराचा समावेश होतो. गर्भगृह, सभामंडप आणि नृत्यमंडप अशा तीन प्रमुख भागात या मंदिराचे बांधकाम केले आहे. या मंदिराच्या शिखरावरील कलशाचे वजन दहा टन आहे तर ध्वजाची उंची सत्तावीस फूट आहे. प्राचीन ग्रंथानुसार सोम राजा अर्थात चंद्राने आपल्यावर असलेल्या शापाचे निराकरण याठिकाणी केले. सोम राजा भगवान शंकराच्या आशीर्वादाने शापातून मुक्त झाला. म्हणून या ठिकाणाला सोमनाथ हे नाव पडले अशी अख्यायिका आहे.
२. मल्लिकार्जुन :
या ठिकाणची अशी कथा आहे की, रागावून गेलेल्या कार्तिक यास भेटण्यासाठी मल्लिका म्हणजेच माता पार्वती व अर्जून म्हणजेच भगवान शंकर सोबत आले. म्हणून या ठिकाणास मल्लिकार्जुन असे म्हणतात.
३. महाकालेश्वर :
हे जोतीर्लिंग स्वयंभू आहे. रुद्रसागर तलावाच्या काठावर उज्जैन शहरात हे मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे भगवान शंकराची प्रतिमा ही दक्षिाभिमुख आहे. बारा ज्योतिर्लिंगतील या लिंगाच्या प्रतीमेमुळे येथे वर्षातून एकदा महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजता भस्म आरती होते.
या ठिकाण विषयी एक दंत कथा अशीही आहे की , महाकालेश्वर
महेश म्हणजेच भगवान शंकराच्या मनामध्ये एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांची परीक्षा घ्यावी असे आले. भगवान शंकराने ब्रह्मा आणि विष्णू यांना प्रकाशाचा अंत शोधण्यास सांगितले. यामध्ये भगवान विष्णू यांनी हार मानली तर ब्रम्हा यांनी खोटे उत्तर दिले. म्हणून या ठिकाणी शिवशंभुने महाकालरूप धारण केले. यावरून याला महाकालेश्वर असे म्हटले जाते.
४. ओंकारेश्वर :
मध्य प्रदेशच्या खंडवा जिल्ह्यात नर्मदा नदीत शिवपुरी बेटावर हे मंदिर वसलेले आहे. या ठिकाणची निर्मिती पवित्र अशा नर्मदा नदी पासून झाली आहे. या ठिकाणची पण कथा आहे ती अशी की , ओंकारेश्वर
राजा मान्धाताने येथे नर्मदा किनारी घोर तपस्या करून भगवान शिवला प्रसन्न केले आणि त्यांच्याकडून येथेच निवास करण्याचे वरदान मागून घेतले.
येथे एकूण ६८ तीर्थ असून येथ ३३ कोटी देवता राहतात अशी कल्पना आहे. याशिवाय येथे २ ज्योतिस्वरूप लिंग यासहित १०८ प्रभावशाली शिवलिंग आहेत.
शास्त्र मान्यता अशी आहे की कोणीही तीर्थयात्री देशाची सगळी तीर्थ करून घेऊ दे परंतु जोपर्यंत तो ओंकारेश्वर येऊन केलेल्या तीर्थोंचे जल आणून येथे चढवत नाही तोपर्यंत त्याचे सगळे तीर्थ अधूरे मानले जातात.
५. परळी वैजनाथ :
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात हे ठिकाण वसलेले आहे. बारा ज्योतिर्लिंग पैकी हे सगळ्यात जागृत देवस्थान मानले जाते. या मंदिराचे बांधकाम चिरेबंदी असून खूप भव्य दिव्य आहे. बाकी कोणत्याही जोतोर्लींगाच्या ठिकाणी नाही पण येथे देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते. येथील मंदिर परिसरात तीन कुंड आहेत. कुष्ठरोगापासून बरे होण्यासाठी अनेक रोगी येथे येतात.
हेही वाचा
पंचमहाभुतांचा तेजःपुंज अवतार असलेला कोल्हापूरचा ज्योतिबा माहिती आणि कथा
६. रामेश्वर :
भारताच्या तामिळनाडू राज्यातील रामेश्वरम् बेटावरील हे ठिकाण आहे. प्रभू रामचंद्रानी रावणाविरुद्ध लढलेल्या युद्धातील पापांचे प्रक्षालान करण्यासाठी या ठिकाणी वाळूचे शिवलिंग बनवून भगवान शंकराची आराधना केली. त्यांच्यावर प्रसन्न होऊन भगवान शंकराने त्या ठिकाणी ज्योतिर्लिंगाच्या रूपात निवास करण्याचे वचन भगवान रामचंद्रांना दिले. हे तीर्थक्षेत्र बारा ज्योतिर्लिंगांपैकी व चार धामांपैकी एक मानले जाते. हे मंदिर १००० फुट लांब , ६५० फुट रुंद आणि १२५ फुट उंच असे आहे. येथे वार्षिक उत्सवाच्या वेळेस भगवान शंकर व पार्वतीची सोन्या चांदीच्या रथातून भव्य मिरवणूक काढतात.
७. विश्वेश्वर :
हे बारा ज्योतिर्लिंगपैकी सर्वात पवित्र स्थान मानले जाते. एकदा कैलासावर भस्म लावून राहणाऱ्या शंकराची संगळ्यानी टिंगल केली. तेंव्हा माता पार्वतीने भगवान शंकरांना विनंती केली की मला येथून दूर कुठेतरी घेऊन चला. तेंव्हा भगवान शंकर काशी म्हणजेच वाराणसी येथे रहिले त्यामुळे हे लिंग रूप काशीत पुजले जाते. हे ठिकाण कोणाच्याही तपस्येने तयार झाले नसून साक्षात भगवान शंकर हेच विश्वनाथच्या रुपात येथे प्रकट झाले आहेत. असे म्हणतात की येथे मृत्यू येणाऱ्या प्रत्येकाला मोक्ष मिळतो.
८. नागेश्र्वर :
महाराष्ट्रातील हिंगोली जिल्हा मध्ये असणारे हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ठिकाण आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेला आहे. औंढा नागनाथ या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणाला नागनाथ असेदेखील म्हटले जाते. पांडवांच्या १४ वर्षाच्या अज्ञातवासात धर्मराज युधिष्ठीर याने औंढा नागनाथाचे मंदिर बांधल्याचे आणि महादेवाची स्थापना केल्याचे म्हटले जाते.
९. घृष्णेश्वर :
महाराष्ट्रातील औरंगाबाद येथील संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वेरूळ लेण्याजवळ हे मंदिर आहे. येथे शिवकुंड नावाचे सरोवर देखील आहे. हिंदू धर्माच्या आख्यायिकेनुसार घृष्णेच्या विनंतीवरून भगवान शंकर तिथे झाले म्हणून या ठिकाणाला घृष्णेश्वर असे म्हणतात. घृष्णा नावाची एक स्त्री होती. तिला पुत्रप्राप्ती भगवान शंकराच्या भक्तीने झालेली होती. ई. स १७६५ ते ई. स. १७९५ दरम्यान अहिल्याबाई होळकरांनी हे सगळं मंदिर बांधून नक्षीकाम करून घेतले होते.
१०. केदारेश्वर :
केदारेश्वर म्हणजेच केदारनाथ हे ठिकाण हिमालयाच्या गडवाल रांगेमध्ये वसलेले एक ठिकाण आहे. उत्तराखंड राज्याच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यांमध्ये हे ठिकाण आहे. कार्तिक महिन्यापासून चैत्र महिन्यापर्यंत हे मंदिर बर्फाच्छादित असते. बारा ज्योतिर्लिंग बरोबरच चारधाम पैकी हे एक ठिकाण आहे. पुराणाप्रमाणे भगवान विष्णू जगाच्या कल्याणाकरिता पृथ्वीवर निवास करण्यासाठी आले.त्यांनी बद्रीनाथमध्ये आपले पहिले पाउल ठेवले. हे अगोदर भगवान शिवाचे स्थान होते. परंतु भगवान विष्णूसाठी त्यांनी या स्थानाचा त्याग केला आणि केदारनाथमध्ये वास्तव्य केले. या ठिकाणी शंकराचार्यांनी वयाच्या ३२ व्या वर्षी समाधी घेतली.
११. त्र्यंबकेश्वर :
त्र्यंबकेश्वराचे ज्योतिर्लिंग मंदिर नाशिक पासून जवळच ब्रम्हगिरी पर्वतावरती आहे. याच ठिकाणी दक्षिण गंगा म्हणजे गोदावरी नदीचा उगम होतो. गौतम ऋषींच्या विनंतीवरून गंगा येथे प्रकट झाली व भगवान शंकर लिंग रूपाने अवतरले अशी आख्यायिका आहे.
या ज्योतिर्लिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे शिवलिंगास ब्रम्हा, विष्णू, महेश या तिघांच्या प्रतिमा आहेत. त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी या पर्वताच्या पायथ्याशी वसले आहे. हा पर्वत म्हणजे शिवाचे एक रूप मानले जाते.
१२. भीमाशंकर :
कुंभकर्णाचा मुलगा भीम आणि भोलेनाथ यांच्यामध्ये या ठिकाणी युद्ध झाले म्हणून या ठिकाणाला भीमाशंकर असे नाव पडले.पुण्यापासून तुलनात्मक दृष्टीने जवळच असणारे हे ठिकाण आहे. सुमारे तेराशे वर्षापूर्वीचे हे मंदिर आहे. , १८ व्या शतकात नाना फडणीसानी हे मंदिर बांधलेले आहे. मंदिर हेमाडपंती आहे. मंदिरावर उत्कृष्ट कलाकुसरीचे नमुने पाहवयास मिळतात. भीमा' नदीचा उगम आणि श्री महादेवाचे - शंकराचे स्थान, म्हणून याला
भीमा-शंकर’ असे म्हणतात.
तर असे हे बारा ज्योतिर्लिंग आणि त्यांच्या निर्मितीची कथा रंजक तर आहेच शिवाय एकदा तरी आपण दर्शन घ्यायला हवे असेच पवित्र तीर्थक्षेत्र आहे.
===================
प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.