Skip to content Skip to sidebar Skip to footer

अकरा लाखांची पैठणी

– कृष्णकेशव

अजय आज मुडमध्ये होता..त्याला कारणही तसचं होतं..!

    त्यांचं मागच्या पाच वर्षांपासूनच ‘बुलेट क्लासिक’ घेण्याचं स्वप्न आता पूर्ण होणार होतं..ती बाईक घेण्यासाठी बॅंकेत उघडलेल्या रिकरींग अकौंटचे पन्नास हजार रुपये त्याच्या खात्यात जमा झाले होते आणि बाकीचे पैसे बॅंकेनं लोन मंजूर केलं होतं..

        लॅपटॉपवर आज त्याचं लक्ष नव्हतं आणि त्याच्या डोळ्यासमोर त्याला आज फक्त त्याची आवडती बुलेट दिसत होती..!

    आणि एवढ्यात मोबाईलची रिंग वाजली.. तो अनिताच्या कॉल होता..!

      ” अजय ! अरे आज संध्याकाळी लवकर ये..एक ग्रेट न्यूज आहे.!. तुला कधी एकदा सांगेन असं झालंय..पण सरप्राइज आहे ना.. फोनवर नाही सांगणार..!”

      आणि अनिताचं सरप्राइज  म्हणजे आश्चर्य कमी आणि धक्के जास्त..!

     त्यात आज सकाळीच त्यानं कधी नव्हे ते वर्तमानपत्रातलं आपलं ‘आजचं भविष्य’ वाचलं होतं..

“अनपेक्षित खर्च होईल..सावध रहा..!”

    अजयनं आल्या आल्या गळ्यातली सॅक सोफ्यावर टाकून दिली आणि शूज काढता काढताच अनिताला

हाक मारली..”अनु डिअर  मी आलोय..!”

       “जस्ट अ मिनीट..” असं म्हणत अनिता बाहेर आली..आणि अजयला पहिला धक्का बसला..!

      अनिता आज चक्क साडीवर होती..!!

   पिझ्झा आणि ‘एक्सप्रेस’ कॉफीचा मग (गरम गरम पोहे आणि वाफाळलेला चहा केंव्हाच इतिहासजमा झालायं..)त्याच्या समोर ठेवत म्हणाली..”अजय..अरे ‘झी ‘मराठीवरच्या ‘अकरा लाखांची पैठणी’च्या  ‘अॉडिशन’साठी माझं सिलेक्शन झालयं..!’आदेश भावजी’चा सकाळीच मला मेल आलाय..

हाऊ ग्रेट ना..!

तुला लवकरचं मी आता स्क्रीनवर दिसेन..!”

        “कॉंग्रेटस्..! अजय थोडसं चमकून म्हणाला..पण तुझ्या अंगावर नेहमीचा ‘ड्रेस’ किंवा ‘वनपीस’ सोडून आज साडी कशी काय आली..?

          “अरे आदेश भावजीनी स्ट्रीक्टली सांगितलयं अॉडिशन साडीमध्ये होणार म्हणून..!

आणि मला साडीची अजिबात सवय नाहीय..

ही मी दिदीची प्रॅक्टीससाठी

म्हणून आणलीय..

        आणि हो.. आज आपल्याला ‘अॉडीशन’ची साडी घ्यायला ‘स्वामिनी’मध्ये

जायचय..आणि मला  ‘प्राजक्ता माळी’सारखी

‘ हास्यजत्रा’मध्ये होती तशी ‘फ्लोरल प्रिंटेड’ची ग्रिनीश साडी घ्यायचीय..!”

       अजयला आता मात्र धोक्याची चाहूल लागली होती..

       “अगं पण एका फंक्शनसाठी  साडी विकत घ्यायची गरज काय.? नाहीतरी तुझा लग्नातला शालू तसा नवीनच आहे..!आणि परत कधीही तू तो नेसलेला मला आठवत नाही..”  प्राजक्ता माळीच्या ‘फ्लोरल प्रिंटेड’ साडीची किंमत काय असेल याचा मनातल्या मनात विचार करत अजय म्हणाला..!

     “मला वाटलचं तू असं काहीतरी बोलणार म्हणून..!

बायको एवढी स्क्रीनवर येणार त्यांचं कौतुक नाहीच उलट लग्नातला ‘आऊटडेटेड’ शालू एवढ्या मोठ्या इव्हेंट साठी नेस म्हणतोस..आणि मी तो तर मुळीच नेसणार नाही.. सांगून ठेवते..माझ्यासाठी तो ‘अनलकी’ आहे.. लग्नाच्या दिवशीच मी त्या शालूमुळं

खाली पडले होते..”

   आता शालू नीट नेसता न आल्यामुळे  पडली असेल तर तो शालू अनलकी कसा काय ?..

हे अजयच”लॉजिक”..

  आणि  शालू अनलकी की लग्न अनलकी हे एक्सटेंडेड लॉजिक..!

      “आणि प्राजक्ताची ती साडी पंचाहत्तर हजाराची आहे..मी अॉनलाईन सर्च केलयं..पण मी आपल्या बजेटमधल्या पंधरा ते वीस हजाराच्या रेंज मधली साडीच सिलेक्ट करणार आहे..मला कळतं

तेवढं..!”..अनिता फणकारली..

     ” तसं नाही गं..” सकाळचा ‘अनपेक्षीत खर्च’ बहुतेक पंधरावीस हजारांवर टळणार

असा विचार करीत तो म्हणाला “तुला साडीची आवड नाही म्हणून मी तसं म्हटलं..ओ के चल कधी जायचं..? आय एम रेडी..!”

      “अरे पण सात वाजता पाटणकर मॅडम येणार आहेत..त्यांचा ‘आम्ही मैत्रिणी’ हा मंगळागौरीची गाणी आणि खेळ करणारा गृप आहे त्या वेगवेगळे खेळ आणि उखाणी पण शिकवणार आहेत.. त्यांचा सगळा गृप येणार आहे..त्यांची फी पण जास्त नाहीय.. तीन

दिवसाचे तीन हजार  म्हणाल्या त्या..आणि बहुतेक इपिसोडमध्ये आदेशभावजी  उखाणा घ्यायला लावतातच..(मागच्या अर्ध्या तासातलं आदेश भावजींच तिसऱ्यांदा कौतुक..!)

         मंगळागौरीच्या खेळानं पैठणी मिळणार असेल तर महाराष्ट्रातल्या तमाम ‘वहिनी’नी वर्षभर मंगळागौर साजरी केली असती..

       ..आणि उखाण्याचं म्हणाल तर “नववधूचे शंभर उखाणे” हे पुस्तक बाजारातून

त्यानं दहा रूपयात आणून दिल असतं..!

     अजयच्या डोक्यात पुन्हा एकदा असले निरर्थक विचार येऊन गेले..!

    “आणखी एक सांगायचं राहिलंच..ऑडिशनच्या दिवशी मेकअप पण करावा लागणार आहे..! मी

‘एस्थेटीक’च्या रोहिणी मॅडमनां सांगून ठेवलंय..

त्या म्हणाल्या स्टेज शोचं मेकअप पॅकेज दहा हजार पर्यंत असतं पण मी त्यांची ओल्ड कस्टमर आहे म्हणून  त्या फक्त पाच हजार घेणार आहेत..!!”

     आता अजयनं कालच्या रिकरींगमधले किती पैसे शिल्लक राहतील ह्याचा हिशोब करणं सोडून दिलयं..!

    ‘अकरा लाखांच्या पैठणीत’ अनिता कशी दिसेल

“हे दृश्य त्याच्या डोळ्यासमोर सारखं तरळू लागलयं..

      आणि अनिताच्या अकरा लाखांच्या पैठणीच्या ‘स्टेटस’ला शोभेल अशी ‘फोरव्हीलर’ घेण्यासाठी बॅंकेत दोन लाख मिळणार नवीन रिकरींग खातं त्यानं पुन्हा उघडायच  ठरवलयं..!!

कृष्णकेशव

==================

नमस्कार वाचकहो🙏🙏,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Leave a Comment

error: