Ritbhatmarathi

Search
Close this search box.

©® सौ. गीता गजानन गरुड.

साऊ सासूसासऱ्यांचं सारं पहात होती. प्रल्हादलाही वेळेवर न्याहारी, जेवण देत होती. सासूही डोळस माणसाला लाजवेल अशी घरकाम करत होती. सासऱ्यांचा डावा पाय ओढावा लागे तरी ते स्वतः बाजारात जाऊन भाजीफळं घेऊन येत.

लवकरच त्यांचं स्वत:चं घर बांधून पुर्ण होणार होतं.  जरा बाहेर जाऊन येतो म्हणून प्रल्हाद बाहेर पडला, तो अगदी गुळगुळीत गोटा करुन आला.

साऊला रडूच आलं. त्याने साऊला जवळ घेतलं नं समजावलं”साऊ, मला तुला विकेशावस्थेत राहिल्यावर काय वेदना होत असाव्यात हे जाणून घ्यायचंय जेणेकरुन मी कधीही तुला केसांवरुन बोलणार नाही.”

सदगदित होऊन साऊ त्याचे पाय धरु लागली तसं प्रल्हादने तिला मिठीत घेतलं. तिच्या गोऱ्यापान कपाळावर ओठ टेकले. तिच्या अर्धोन्मिलित पापण्यांवर ओठ टेकले नं तसंच खाली तिच्या गालांचं जिथे भागिरथीने कोलीत लावल्याच्या खुणांचे डाग होते, त्यांचं चुंबन घेतलं. “एक महिन्याच्या आत हे डाग जातील बघ गालावरचे?”

“खरंच?”

“हो मलम आहे माझ्याकडे.”

“बघू बघू”

” हे बघ म्हणत त्याने साऊच्या ओठांचं रसपान केलं.”

“अहो, कोणीतरी बघेल,ऐकेल नं.”

“आई निजलेय नं अण्णा काठी घेऊन बाहेरच्या पारावर गेलेत बसायला..तेंव्हा.”

सासू जरा चुळबुळली..कुशीने झाली तशी साऊ आतल्या खोलीत पळाली. “मी काय म्हणते..भूक लागली असेल नं तुम्हाला. शिरा करते झटपट. बघा तरी माझ्या हातचा.”

“नकोच. मला फक्त तू हवीस. द्रिष्टीपासून तू जरासुद्धा बाजूला व्हावीशी वाटत नाही बघ. पार वेडं केलंस या गुरुजीला.”

“खरंच!”

प्रल्हादने साऊची हनुवटी वर करत तिच्या डोळ्यांत पाहिलं. तिच्या मेंदी सजल्या तळहातांवर ओठ टेकवले.

त्या पहिल्यावहिल्या स्पर्शाने साऊच्या गात्रांत सतार झंकारली.

दूर कुठे समयोचित गाणं सुरु होतं..

तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला
माझ्यामनी प्रीत तुझी घेते हिंदोळा

गायिलेस डोळयांनी एक निळे गाणे
बट हळवी वार्‍यातील वेचिते तराणे
नकळत तव हात प्रिये हाती मम आला

पवनातूनी शीतलता दाटूनिया आली
दोन मने प्रीतीच्या गंगेतच न्हाली
आसमंत आनंदी धूंद धूंद झाला

ही दुपार भिजलेली, प्रीत चांदण्यात
मिटून पंख खग निवांत शांत तरुलतांत
आज तुझ्या सहवासी जीव धन्य झाला

कितीतरी वेळ दोघंही साखरमिठीत होती. ती मिठी कितीही पांघरली तरी समाधान थोडीच होणार होतं!

कोणतरी शेजारचं साद घालू लागलं नंं साऊ उठली. पदर,निऱ्या सारख्या करुन बैठकीच्या खोलीत आली..

दोघीतिघी शेजारणी आल्या होत्या. साऊला अभंग गाता येतात म्हणल्यावर शेजारणींनी रोज गाऊन दाखव म्हणून आग्रह केला. साऊ लाजत हो म्हणाली.

रात्री साऊची सासू म्हणाली,”साऊ, सरस्वती प्रसन्न आहे तुझ्यावर. तू पुढे शीक. प्रल्हादसारखी शिक्षिका हो. आमची काळजी करु नकोस. आधीही आमच्या हाताने करुन खायचो,तसं करु. तुम्ही दोघंही अहातच मदतीला. हेच वय आहे शिकायचं. शिकून घे.” सासूचं हे बोलणं ऐकून साऊला खूप आनंद झाला. तिचं अर्धवट राहिलेलं शिक्षण मार्गी लागणार होतं.

इकडे भागिरथीकाकूंची साऊ गेल्यापासनं ससेहोलपट होत होती. साऊचे वडील आपल्या कामाला निघून गेले. अजून दहा दिवस राहिले असते तरी मालक काही बोलले नसते पण भागिरथीकाकू दिवसभर त्यांची वाक्पूजा करत रहायची.

काम काय कमी ते! पहाटे उठून केरवारा करणं,सडा शिंपडणं, रांगोळी रेखाटणं, पाणी शेंदणं..सगळ्यांनी एव्हाना पंप बसवले होते पण त्यावेळी भागिरथीकाकूनेच जुनं ते सोनं म्हणत नाक मुरडलं होतं.

आता मात्र तिला पंप बसवून घ्यावा लागणार होता. जगन,छगन दोघांनाही उठल्याबरोबर भाजीभाकरी लागायची.
दोघंही चारचार भाकऱ्या खायचे. खाणं दणकट होतं त्यांचं..कामाचं तेवढं बोलता कामा नये होतं.

साऊच्या वडिलांनी ते तिथे असेपर्यंत कपिलेचं दूध काढलं पण ते कामाच्या गावाला गेले नि धारा काढायचं काम भागिरथी काकूच्या गळ्यात पडलं.

कधी नव्हे ते गोडगोड बोलत भागिरथी काकूने कपिलेसमोर आंबोण ठेवलं.

कपिलेने आंबोणाच्या घमेल्याला तोंड लावलं नाही. धारा द्यायची बात सोडाच,भागिरथी काकूला चांगलाच लाथांचा प्रसाद दिला. अगं आई गं.. विव्हळत भागिरथी काकू उठली.

कपिलेचे हे रागरंग पाहून भागिरथी काकूने ताडलं की ही काही आपल्याला झेपायची नाही. ती कपिलेला व वासराला घेऊन साऊच्या घरी गेली. साऊ दिसताच कपिला हंबरु लागली. तिने साऊच्या अंगणातच धार सोडली. वासरु पान्हा लुचू लागलं.

साऊच्या सासऱ्यांनी कपिलेच्या पाठीवरुन हात फिरवला. सासूने आजुबाजूला वाढलेला हिरवा चारा तिला खाऊ घातला.

भागिरथी काकूने साऊला सांगितलं,”तू नि तुझे वडील नाहीत तर ही बया मला कास धरु देत नाही. ही ब्याद तुझ्याकडेच ठेव. तू दूध काढत जा. जगनछगन शाळेतनं आल्यावर दूध न्यायला येतील.”

साऊ, कपिला आपल्या घरी रहाणार म्हणून आनंदली. तिने ओवाळणीचं ताट आणून कपिलेचं व वासराचं औक्षण केलं.  प्रल्हादला कपिलेसाठी तीळाची पेंड आणायला सांगितलं.

——–           

सारंगच्या घरातली पाहुणीमाणसं हळूहळू आपापल्या घरी जायला निघत होती. निघताना एकदोघींच्या लक्षात आलं, आपल्या दागिन्यांत काहीतरी कमी आहे. एकीची अंगठी हरवली होती तर एकीचा चंद्रहार.

अंघोळी करताना बाया आपले दागिने कठड्यावर काढून ठेवायच्या तेंव्हा तिथे चांदणीच असायची उचलपाचल करायला.

मालतीच्या लक्षात सारा प्रकार आला. ती चांदणीला हाताला धरुन तिच्या खोलीत गेली. चांदणी हो ना करत असताना तिने जरबीने तिला बेग खोलायला लावली. त्यात तळाला या वस्तू होत्या.

“इथे रहायचं तितके दिवस राहू शकतेस तू पण चोरीमारी या घरात खपायची नाही नि पचायची त्याहून नाही,” मालतीने करड्या वाणीत तिला सुनावलं.

पाहुणीमंडळींना मात्र, शिल्पानेच कठड्यावरच्या वस्तू उचलून नीट ठेवून दिल्या होत्या नि घाईगडबडीत सांगायला विसरली असं सांगत निभावून न्हेलं. चांदणीला मात्र या प्रकाराने चांगलच तोंडात मारल्यासारखं झालं. दिपकही तिच्याशी बोलायचा बंद झाला.

सारंग प्रभाकरला टाळत नव्हता तरी बाप म्हणून जवळ बसून बोलतही नव्हता. आणि मालती..लेकाच्या लग्नात रेशमी साड्या ल्यालेली, नाकात पाणीदार मोत्यांची ठसठशीत नथ, गळाभर दागिने, आईने दिलेली मोहनमाळ,  केसांचा भरगच्च अंबाडा, त्यांवर अबोली, शेवंतीची वेणी..काय उठून दिसत होती यजमानीनबाय!

चेहऱ्यावर समाधान ओसंडून वहाणारी मालती अधिकच देखणी दिसत होती. चांदणीच्या अधिकपटीने उजवी दिसत होती. मनाचं सौंदर्य मुद्रेवर उमटलं होतं..पौर्णिमेचा चांद जणू.

या वयातही मालतीशी संग करण्याची प्रभाकरची वासना उफाळून आली.

कदाचित, महिनादोनमहिन्यांत झालेले अपमान त्याच्या या संबंधाने बुजले जाणार होते. पुन्हा एकदा तो फणा काढून डोलणार होता.

नीजानीज झाली तशी प्रभाकर दबक्या पावलांनी मालतीच्या खोलीपाशी येरझाऱ्या घालू लागला.  माजघरातली झकपक आवरुन, कडीकोयंडे लावून मालती तिच्या खोलीकडे जायला नं प्रभाकर सामोरा यायला एकच गाठ पडली.

प्रभाकरचे डोळे वासनेने लाल झाले होते, नाक फुललं होतं. पण तो चुकत होता..चुकत होता तो..मालती आता पुर्वीची दीनदुबळी मालती राहिली नव्हती.

मालतीने जळजळतीत कटाक्ष प्रभाकरच्या वासनांध नजरेत टाकला. तिच्या प्रखर नेत्रज्योतींनी प्रभाकर नखशिखांत हादरला,

उभ्या जागी थरथरु लागला. त्याचं सारं अवसान,वासना..गळून पडल्या.

कधी एकदा मालतीच्या नजरेसमोरून पळ काढतो असं झालं त्याचं. डोकं चेचलेल्या जनावरासारखी अवस्था झाली त्याची.

झरकन तो माघारी फिरला.

मालती आत जाऊन पलंगपोसावर पहुडली. मग उठून आरशासमोर बसली.

आरशातली तिची प्रतिमा म्हणाली, ‘मालू, आज इतक्या वर्षानंतर प्रथमच इतकी धीराने वागलीस. नकार नजरेने दर्शवायची ताकद आली तुझ्यात.

तो प्रभाकर..ज्याने तुझ्या जन्माचं वाटोळं केलं..खोट्या प्रेमाची भूल घालून जाळ्यात ओढलं.

लोकांना दाखवण्यासाठी तुझ्याशी लग्न केलं नि स्वतःच्या चैनीसाठी बाहेर घरोबा केला..

त्याच्या पाशवी अत्याचाराला, बलात्काराला बळी पडत आलीस पण ही अशी धार कशी आली तुझ्या सर्वांगात?”

मालतीने स्मित करत आरशातल्या मालूकडे पाहिलं व म्हणाली,” त्यादिवशी प्रभादाने माझं माहेरपण केलं, काल आहेर देताना इतक्या मायेने माझ्या हातांना कुरवाळलं..मधल्या काळात विणली गेलेली गैरसमजांची जाळी गळून पडली.

माहेरचं नं माझं नातं नितळ झालं..नि दहा हत्तींचं बळ आलं माझ्या अंगात.

एवढे दिवस माहेर अंतरलं म्हणून शेळीसारखी वावरत होते.

आता माझा दादा आहे माझ्या पाठीशी..वडासारखा भक्कम आधार. काय बिषाद त्या छंदीफंदी नवऱ्याची माझ्या अंगाला बोट लावण्याची!”

“मग त्या चांदणीबद्दल असूया वगैरे?.”

“छे! मुळीच नाही. ज्याचं कर्म त्याला. मुळात त्या प्रभाकरला मी नवरा मानत नाही तर ती चांदणी माझी सवत कशी असेल!”

आरशातली मालू लुप्त झाली. तिला तिच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळाली होती.

खिडकीतनं येणारी रातराणीची सुगंधित झुळूक पांघरुन स्वतःलाच आंजारत गोंजारत मालती झोपी गेली.

माडीवरल्या सारंगाच्या खोलीत सारंगा न् आरोहीचा प्रणय बहरात आला होता.

दोघा कोवळ्या प्रेमीजीवांच  ते प्रथम मिलन होतं. आरोहीला सारंगने कवेत घेतलं होतं.

तिच्या थरथरत्या सर्वांगावर तो आपल्या अधरांचे ठसे उमटवीत होता तशी वाऱ्याच्या स्पर्शाने कळीचं गात्र न् गात्र मोहरुन उठावं तशी आरोहीची समाधीस्त अवस्था झाली होती.

मिटल्या पापण्यांत तिला केवळ अत्युच्च सुख दिसत होतं. दोघंही सुखाचा सर्वांगसुंदर सोहळा अनुभवत होती.

धुंद एकांत हा, प्रीत आकारली
सहज मी छेडिता तार झंकारली

जाण नाही मला प्रीत आकारली
सहज तू छेडिता तार झंकारली

गंधवेडी कुणी, लाजरी, बावरी
चांदणे शिंपिते चैत्रवेलीवरी
यौवनाने तिला आज शृंगारली

गोड संवेदना अंतरी या उठे
फूल होता कळी, पाकळी ही मिटे
लोचनी चिंतनी मूर्त साकारली

रोमरोमांतुनी गीत मी गाइले
दाट होता धुके स्वप्‍न मी पाहिले
पाहता पाहता रात्र अंधारली

आज बाहुत या लाज आकारली
सहज तू छेडिता तार झंकारत रली

पहाटे पहाटे झोप अनावर न झाल्याने एकमेकांना पांघरुन ते नवीन जोडपं झोपी गेलं.

आरोहीला जाग आली तेंव्हा चांगलच उजाडलं होतं.

सारंगचा मजबूत हात हलकेच बाजूला करत ती दारापाशी गेली. कडी काढून मागिलदारी जाऊन उभी राहिली.

तिचे विस्कटलेले केस, आरक्त गाल पाहून शिल्पा स्तिमित झाली.

एका रात्रीत वहिनी इतकी तेजाळली..चैत्र ऋतूत आंब्याचं मोहरलेलं झाड जसं दिसतं तशी ती शिल्पाला भासली.

“शिल्पा, अगं बघतेस काय अशी!” शिल्पाच्या आ वासलेल्या चेहऱ्याकडे बघत आरोहीने विचारलं.

क्रमश:

==============

http://www.ritbhatmarathi.com/prapanch-part1/

प्रपंच भाग २ :

http://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag-2/

प्रपंच भाग ३ :

http://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag-2/

प्रपंच भाग ३ :

http://www.ritbhatmarathi.com/prapanch-part3/

प्रपंच भाग ४ :

http://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag4/

प्रपंच भाग ५ :

http://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag-5/

प्रपंच भाग ६ :

http://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag-6/

प्रपंच भाग ७ :

http://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag-7/

प्रपंच भाग ८ :

http://www.ritbhatmarathi.com/prapanch-part-8/

प्रपंच भाग 9 :

http://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag-9/

प्रपंच भाग १० :

http://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag-10/

प्रपंच भाग ११ :

http://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag-11/

प्रपंच भाग १३ :

http://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag-13/

====================

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *